2025 Pradosh Shivratri Vrat In Marathi: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्। उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।। सन २०२५ सुरू झाले आहे. सन २०२५च्या सुरुवातीपासून अनेक अद्भूत योग, शुभ योग जुळून येत आहेत. शुभ योगात व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जात आहे. विशेष म्हणजे १४४ वर्षांनी येणारा महाकुंभमेळ्याचा योग २०२५च्या आरंभीच आला आहे. महाशिवरात्रीपर्यंत हा महाकुंभमेळा सुरू राहणार आहे. जानेवारी महिन्याची सांगता होत असताना प्रदोष आणि शिवरात्रि व्रत एकाच दिवशी आले आहे. ही दोन्ही व्रते महादेवांना समर्पित असून, सोमवारी याचे व्रताचरण असल्यामुळे याचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
सोमवार, २७ जानेवारी २०२५ रोजी एकाच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्रि व्रताचा योग जुळून आला आहे. प्रदोष व्रत आणि शिवरात्री एकाच दिवशी आले आहेत. हा शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. तसेच सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.
प्रदोष आणि शिवरात्रि शिवपूजन व्रत पूजा विधी
प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
सोम प्रदोष व्रतावेळी चंद्र देवाच्या मंत्राचा जप
नवग्रहात चंद्र हा सर्वांत वेगाने गोचर करणार ग्रह मानला जातो. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी चंद्र देवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्यात. तसेच चंद्र देवाशी निगडीत वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. चंद्र देवाचा गायत्री मंत्र, प्रभावी मंत्र, नवग्रहातील स्तोत्रातील मंत्र यांचा यथाशक्ती जप करावा. असे केल्याने चंद्र देवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान आणि प्रभाव मजबूत होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
|| हर हर महादेव ||