शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांच्या ताकाची ही बोधकथा; घोट घोट घेत वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 26, 2021 10:00 IST

आपणही कर्माचा मोबदला मिळेल या आशेने नाही, तर कर्तव्य भावनेने सत्कर्माची सवय लावून घेऊया. 

हिंदीत एक वाकप्रचार आहे, 'नेकी कर और दर्या में डाल' अर्थात सत्कर्म कर आणि त्याचा हिशोब ठेवणं विसरून जा. तुमचे कर्म चांगले असेल, तर आज ना उद्या त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल आणि तुमचे कर्म वाईट असेल, तर त्याची शिक्षा आज ना उद्या तुम्हाला निश्चित मिळेल. आपल्या कर्मापासून आपण पळवाट शोधू शकत नाही. कारण आपण कितीही पळालो, तरी कर्म आपल्याला शोधत येते आणि चिकटते. असे असेल तर मग सत्कर्मच का करू नये? 

एक गरीब मुलगा दारोदारी सामान विकून आपले आणि कुटुंबाचे पालन पोषण करत होता. गरीब असूनही त्याच्या ठायी शिक्षणाची ओढ होती. रात्रशाळेत  शिकून तो आपली ज्ञानलालसा भागवत होता. सकाळी काम, रात्री अभ्यास हा त्याचा नित्याचा क्रम होता. 

एक दिवस उन्हाचा दारोदार सामान विकत भटकत असताना त्याने एक दार ठोठावले आणि सामानाची खरेदी विक्री सोडून भांडभर पाणी प्यायला मागितले. दार उघडणाऱ्या मुलीने आत जाऊन भांडभर पाण्याऐवजी थंडगार ताक दिले. उन्हामुळे मुलाला तहान आणि भूक लागली असेल, या विचाराने मुलीने त्याची तहान ताकावर भागवली. लोणकढं ताक गटागटा पिऊन मुलगा तृप्त झाला. त्याने त्या मुलीचे मनापासून आभार मानले आणि त्या उपकाराची परतफेड कशी करू असे विचारले. 

यावर ती मुलगी म्हणाली, माझ्या आईने शिकवले आहे, की कोणालाही मदत केली, तर त्याचा मोबदला कधीच घेऊ नये. तुझी तहान भागली, याचा मला आनंद आहे. 

त्या मुलीचे बोल मुलाच्या मनात घर करून गेले. त्याने ठरवले, आयुष्यात आपणही एवढे सक्षम बनायचे, की आपल्यालाही कोणा गरजवंताला मदत करता येऊ शकेल. मुलगा आनंदाने परतला. तो दिवस रात्र मेहनत घेऊन शिष्यवृत्तीच्या जोरावर मोठा डॉक्टर बनला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. 

एक दिवस त्याच्याकडे शत्रक्रियेसाठी एक जटिल केस आली. त्याने रुग्णाची सविस्तर माहिती वाचली आणि केसस्टडी केली. रुग्णाच्या माहितीनुसार ती व्यक्ती डॉक्टरांच्या गावातली होती. आपल्या गावाचे नाव वाचून डॉक्टर मोहरले. त्यांनी अभ्यासपूर्ण उपचाराचा विचार केला आणि ठरलेल्या दिवशी शस्त्रक्रिया पार पाडली.

त्या व्यक्तीला शुद्ध आली. आणि काही दिवसात ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन डिसचार्ज घेऊ लागली. तेव्हा हॉस्पिटलचे बिल तिच्यासमोर आले. उपचाराचा खर्च आपल्याला परवडणार नाही, याची तिला खात्री होती. त्या व्यक्तीने भीत भीत लिफाफा उघडला. तर त्यात उपचाराचा लाखोवारी खर्च मांडला होता. परंतु त्यात सर्वात शेवटी बिल भरले गेले असल्याची नोंद होती. 

त्या व्यक्तीने चौकशी केल्यावर कळले, की डॉक्टर साहेबांनी ती रक्कम भरली होती. त्या व्यक्तीने डॉक्टरांची भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले. यावर डॉक्टर म्हणाले, 'तुम्ही काही वर्षांपूर्वी एका गरजू मुलाला भांडभर ताक पाजून उपचाराची किंमत कधीच फेडली आहे. तो गरजू मुलगा मीच होतो. आज मला मदतीची संधी मिळाली, याचा आनंद आहे. पण या मदतीची नोंद मी लगेचच मनातून पुसून टाकणार आहे. कारण मला शक्य तेवढे सत्कर्म करायचे आहे.' 

भांडभर ताकाची किंमत भविष्यात लाखो रुपये असेल, हे त्या मुलीला सेवाभावे मदत करतानाही जाणवले नसेल. परंतु तिचे सत्कर्म तिला शोधत आले आणि त्याचे फळही तिला मिळाले.  आपणही कर्माचा मोबदला मिळेल या आशेने नाही, तर कर्तव्य भावनेने सत्कर्माची सवय लावून घेऊया.