Pandharpur Vitthal Rukmini Mandir: पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शन घेत असतात. दिवसभर भाविकांची रेलचेल सुरू असते. या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. परंतु, आता मंदिर समितीने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता विठ्ठलाचे दर्शन थेट घेता येणार आहे. गर्दीत, रांगेत उभे राहण्याची गरज नाही. परंतु, हा निर्णय कुणासाठी घेण्यात आला आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभराच्या अनेक भागातून विवाह झाला की, नवदाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते. मात्र विठ्ठलाच्या दर्शन रांगेत नवदाम्पत्याला अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून, नवदाम्पत्यासह त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांना विठ्ठलाच्या थेट दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता विवाह झालेल्या नवदाम्पत्याला रांगेल उभे न राहता सुलभपणे विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.
विठुरायाच्या दर्शन वेळेत वाढ
पंढरपूर शहरातील स्थानिकांसाठी सकाळी सहा ते साडेसहा एवढाच वेळ दर्शनासाठी असायचा. परंतु, आता त्यात बदल करण्यात आला आहे. स्थानिकांना आता सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा या वेळात आता थेट दर्शन दिले जाणार आहे. यासंदर्भातील निर्णयही मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, फेब्रुवारीत होणाऱ्या माघ यात्रेसाठी मंदिर समितीची बैठक झाली. आषाढी आणि कार्तिकी या महायात्राप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. तसेच माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती दिली.