Margshirsh Masik Shivratri December 2024: सन २०२४ ची सांगता होत आहे. यासोबतच मराठी वर्षातील मार्गशीर्ष महिनाही संपत आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्दशीला मासिक शिवरात्रि व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील मासिक शिवरात्रि व्रत रविवार, २९ डिसेंबर २०२४ रोजी आहे. याचे व्रताचरण कसे करावे? जाणून घेऊया...
शिवरात्रीला महादेव शिवशंकराचे विशेष पूजन केले जाते. शिवरात्रि ही महादेवांना समर्पित असलेले व्रत आहे. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असल्याचे सांगितले जाते.
महादेवांचे मनोभावे पूजन करा, सुख-समृद्धी मिळवा
प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मार्गशीर्ष महिन्यातील मासिक शिवरात्रि विशेष मानली गेली आहे. या दिवशी मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
परिवर्तन शुभ योग
या दिवशी परिवर्तन योग जुळून येत आहे. चंद्र मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत असेल, तर मंगळ ग्रह चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत आहे.