मार्गशीर्ष मासात केले जाणारे महालक्ष्मी व्रत अतिशय प्रचलित आहे. यंदा या व्रताचे उद्यापन चौथ्या गुरुवारी करत असताना एकादशी तिथी येत असल्याने अनेकांच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी व्रताची माहिती देणारी जी पारंपरिक पोथी आहे, त्यातून याबाबत खुलासा करून घेऊ!
'श्रीमहालक्ष्मीव्रत' या पोथीत लेखक द. शं. केळकर यांनी व्रतासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. हे व्रत सुख, शांती, धन-संपत्ती व श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे. व्रत करणारे स्त्री-पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत. ह्या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मीव्रत पूजाविधीसह करावे. महालक्ष्मीव्रताची कथा व माहात्म्य वाचावे. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभरही करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्रीमहालक्ष्मीव्रतकथा व माहात्म्य ह्यांचे वाचन करावे. व्रताचे उद्यापनाचे दिवशी आठ सुवासिनींना अगर आठ कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मीस्वरूप समजून तिला हळदकुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा. हेच ह्या व्रताचे उद्यापन.
मार्गशीर्षात चार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी (एकादशी, अमावास्या असली तरीही) व्रताचे उद्यापन करावे. व्रताचे दिवशी उपवास करावा. केळी, फळे, दूध घ्यावे. उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे. काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते, तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. तो गुरुवार मोजू नये. इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे. रात्री पूजा करावी. वाटल्यास रात्री जेवू नये.
ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल, त्यांनी रात्री करावे. फक्त दिवसा भोजन करू नये. निराहार राहू नये. या पोथीश्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा. पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी. पोथीवाचनाचे वेळी, महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल. शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल.
मार्गशीर्ष गुरुवार (Margashirsha Guruvar 2024) व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी (दि. २६/१२/२०२४) उद्यापन (Mahalaxmi Vrat Udyapan 2024) करावे, असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे, ज्यांना एकादशीचा उपवास नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे, नैवेद्य करावा. ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी. ज्यांचा एकादशीचा उपवास आहे, त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून, उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा. यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो, अशी माहिती अशोक कुलकर्णी यांनी दिली आहे.
द्वादशीचे दिवशी शुक्रवारी (दि. २७/१२/२०२४) उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा. देवाला उपवास नसतो, देवासाठी मनुष्याने उपवास करावयाचा असतो. इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा.
यंदा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, गेल्या ४ ते ५ वर्षात सोशल मीडियाचा वापर अति प्रमाणात झाल्याने, काही जण चुकीची माहिती प्रसारीत करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात. त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे २६ डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा.