Datta Jayanti: अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त । श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥, अशीच भावावस्था श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यावर होत असावी. द्वितीय दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून, श्रीगुरूंनी याला ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे. आता उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राच्या पोथ्या अनेक संशोधन, त्यावर केलेले संपादनाचे संस्कार आणि प्रचंड मेहनतीने सादर करून समाजासमोर ठेवलेल्या आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण वृत्तीतून, तसेच दत्तगुरुंच्या कृपेने आता उपलब्ध असलेले ग्रंथ सिद्ध झाले आहेत. दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथ, त्याची महती, महात्म्य, मान्यता आणि त्याबाबत असलेल्या श्रद्धा, अनुभूती, समज याविषयी जाणून घेऊया...
सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, अशी संप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. परंतु, याबाबत मतमतांतरे असल्याचे सांगितले जाते. भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे, असे म्हटले जाते. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला ‘गुरुचरित्र’ ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.
श्री गुरुचरित्र ग्रंथाचे स्वरुप कसे आहे?
इ.स. १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिल्याचे म्हटले जाते. श्री गुरुचरित्राचे एकूण ५२, तसेच काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. तर याच्या एकूण ७४९१ ओव्या आहेत. ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी या ग्रंथाची विभागणी केलेली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. श्रीनृसिंह सरस्वती हे जरी ‘गुरुचरित्रा’चे चरित्रनायक असले, तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही या ग्रंथात आहेत. चौथ्या अध्यायात दत्तावताराची कथा उलगडून सांगितली असून पाच ते दहा अध्यायापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्राचा आढावा घेण्यात आला आहे. तर श्रीनृसिंह सरस्वतींचे जीवनचरित्र अकराव्या अध्यायापासून एक्कावन्नाव्या अध्यायापर्यंत आले आहे. योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या लीलांचे वर्णन यात केलेले आढळते. गुरुचरित्रात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने, स्थान महात्म्य आले आहेत, आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. अश्वत्थ, औदुंबर, भस्म महात्म्य विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे महत्त्व विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन अशा अनेक विषयांवर सविस्तर, विस्तृत आणि सखोल भाष्य केलेले आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्यांचे मार्गदर्शन केलेले आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशांची चरित्रे पाहायला मिळतात. साहजिकच हा ग्रंथ सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही. प. पू. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतु गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या.
श्री गुरुचरित्र ग्रंथाबाबत असलेल्या काही मान्यता, तथ्ये
‘गुरुचरित्रा’ची मूळ संहिता आजमितीस उपलब्ध नाही. कै. रा. कृ. कामत यांना गाणगापूर, कडगंची, वाडी, औदुंबर, कुरवपूर, केंगेरी, कुंदगोळ, आंबेवाडी, परोळकर, चिकोडी, बैलहोंगल, टेंबेस्वामीप्रत, साधलेशास्त्री प्रत इत्यादी अनेक हस्तलिखित प्रती उपलब्ध झाल्या. या प्रतीच्या आधारेच त्यांनी ‘गुरुचरित्रा’ची सध्या उपलब्ध असलेली प्रमाणित व संशोधित प्रत तयार केली. ‘गुरुचरित्रा’ची अध्याय संख्या नक्की किती? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही; परंतु या ग्रंथाचे ५१ अध्याय आहेत, याला ‘अवतरणिके’त दोन आधार सापडतात. गुरुचरित्रा’ची अवतरणिका कोणी रचली हे छातीठोकपणे सांगता येत नाही. अवतरणिकेचा अध्याय हा सरस्वती गंगाधराचा नसून मागाहून कोणीतरी रचला आहे; परंतु तो उपकारकच आहे, असे कै. रा. कृ. कामत म्हणतात. तर, श्री. गुर्जर नावाच्या गृहस्थांनी शके १७९६मध्ये मुंबईच्या ‘निर्णयसागर’ छापखान्यात मुद्रित केलेले ‘शतश्र्लोकी गुरुचरित्र’ नावाचे पुस्तक म्हणजेच हा ‘अवतरणिका अध्याय’ होय, हेही ते स्पष्ट करतात. ५२ अध्यायांप्रमाणेच ४९ व ५३ अध्याय असलेल्या पोथ्याही आढळतात. गाणगापूरात उपलब्ध झालेली पोथी ५० अध्यायांची होती, असे सांगितले जाते. सिद्धमुनी यांच्याकडील पुस्तक संस्कृतातच असण्याची दाट शक्यता आहे. ‘महाराष्ट्र सारस्वत’ पुरवणीत कै. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी हा मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडला आहे. सिद्धमुनी नामक स्वामींच्या एका शिष्याने त्यांचे त्रोटक चरित्र यापूर्वीच संस्कृतात लिहिले होते. त्याचाच अनुवाद प्राकृतात ‘गुरुचरित्रकारां’नी केला असावा, असे डॉ. रा. चिं. ढेरे यांचेही मत आहे. गुरुचरित्रात कन्नड भाषेतही काही काव्य, श्लोक असल्याचे पाहायला मिळते.
श्री गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते?
गुरुचरित्राचं पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की, नेमके कशासाठी हे पठण करतो आहोत. आपला नेमका हेतू काय आहे? तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे का? हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्री गुरूचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल नव्हे तर सद्गुरु तत्त्वाकडून काळजी घेतली जाईल, हे निश्चित, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगरहाटी चालवावी हेच सांगितले. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दरवेळी एकाच रुपात येत नाहीत. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल, अशी शिकवण गुरुचरित्रातून मिळते, असे म्हटले जाते.
श्री गुरुचरित्राची पारायण पद्धती, नियम आणि फुलश्रुती
श्री गुरुचरित्र पारायणाची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. या पारायण पद्धतीचे नियम अतिशय काटेकोरपणे पाळूनच गुरुचरित्राचे अनुष्ठान करावे, असे सांगितले जाते. गुरुचरित्र पारायणात सप्ताह पद्धती प्रामुख्याने दिली आहे. यामध्ये एक ते सात दिवस किती आणि कोणते अध्याय वाचावेत, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. धकाधकीच्या जीवनात आपल्याला सप्ताह पद्धती करणे शक्य नसेल, तर तीन दिवसांचे पारायण करता येते. त्यासाठीही तीन दिवसांत किती आणि कोणते अध्याय वाचावेत, हे सांगितलेले आहे. गुरुचरित्र वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्हिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा.
आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते, त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे, असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले, तरी श्रीदत्तात्रेयदेवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्तात्रेयदेवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा. यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. वाचनापूर्वी संध्या व १०८ गायत्री जप अवश्य करावा. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे. वाचनासाठी ठरावीक वेळ, ठरावीक दिशा व ठरावीक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे. पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे.
वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत होऊन सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ खाऊ नये. पोळी, तूप, साखर घेता येते.) रात्री देवाच्या सन्निध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मधेच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने, याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो, असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच, सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बर्हीमुखी होऊन केल्यास इहलौकीक वैभव प्राप्त होते. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती सांगण्यात आली आहे.
गुरुचरित्रातील सर्व ५२ अध्यायाची फलश्रुती पाहण्यासाठी क्लिक करा.
खरोखर गुरुचरित्र हा अमृत ग्रंथ आहे, नित्य अध्याय वाचन या खेरीज या ग्रंथाचे कायम चिंतन, मनन केल्याने गुरुमहाराजांच्या अनेक लीला आजही अनुभवता येतात. आपणास कधी संधी मिळाल्यास श्री गुरुचरित्र ग्रंथांचे आवर्जून पारायण करा. परंतु, नियम लक्षात घेऊनच अनुष्ठान करा आणि अपार गुरुकृपा मिळवा.
गुरुचरित्र पारायण शक्य नाही? एकच स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा... स्तोत्र पाहण्यासाठी क्लिक करा...
आरती श्रीगुरुचरित्राची
मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं ।भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं ।मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥ जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥
श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।नरहरि भारति लीला ब्रह्मादिस्तुत्यं ।कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यं ।पारायण देहि मे पुस्तकमपि चित्यं ॥ २ ॥ जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥
त्वद्रतलीलासारं श्रृतिसकलाकारं ।कांडत्रयविस्तारं प्रत्ययलघुकारं ।कल्पद्रुमफलभारं कल्पित्तदातारं ।पठणामृतरसधारं भवभयपरिहारं ॥ ३ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥
अगाध श्रीगुरुकरुणं भूइच्छातरणं ।ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धारणं ।भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं ।नियमाराधित महिमा मोक्षश्रीवर्णं ॥ ४ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥
श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्र्वरगीतं ।शारदगंगाधरसुतमथितं नवनीतं ।भाविकभक्तप्रियकर कृतलोककदतं ।तद्रेतशेषं वांछित सखा हरिहरचित्तं ॥ ५ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥
ब्रह्मांडनायक दत्तगुरुंचे दैवी शिष्योत्तम, तेजस्वी परंपरा अन् लोकोद्धाराचा अखंडित वसा
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
- देवेश फडके.