गरीब घरात जन्माला येणं हा आपला अपराध नाही, पण गरिबीत मरणं हा सर्वस्वी तुमचा अपराध आहे असे यशस्वी लोक सांगतात. गरिबीत राहावे असे कोणालाही वाटत नाही. परंतु श्रीमंत होणेदेखील सोपे नाही. त्यासाठी अविरत मेहनत, नशिबाची साथ आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर दिवस पालटायला वेळ लागणार नाही.
यासाठीच आचार्य चाणक्य सांगताहेत काही महत्त्वपूर्ण गोष्टी. आचार्य चाणक्यांच्या या धोरणांच्या आधारे चंद्रगुप्त मौर्य नंद वंशाचा सम्राट बनला आणि त्याच्या अनेक शत्रूंचा पराभव करू शकला. चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भरपूर यश मिळते.तसेच गरिबी दूर होते.
>>आचार्य चाणक्य सांगतात की जर तुम्हाला नेहमी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर कधीही अन्न वाया घालवू नका. अन्न वाया गेल्याने माता अन्नपूर्णा रागावते. घरात अन्नान्न दशा होते आणि गरिबी ओढवली जाते.
>>जे इतरांना मदत करतात, पैशाचा उत्तम विनियोग करतात आणि इतरांबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना असते अशा लोकांवर माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो. म्हणून पैसे गुंतवणुकीवर भर द्या आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजातून दुसऱ्यांनाही मदत करा.
>>ज्या कुटुंबात एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा असतो त्या घरात समाधान नांदते. लक्ष्मी मातेला अशी घरे प्रिय असतात. याउलट ज्या घरात सतत हेवेदावे, मत्सर, असमाधानी वृत्ती आणि कलह असतो तिथे लक्ष्मी फार काळ थांबणे पसंत करत नाही.
>>मेहनतीने पैसा सगळेजण कमावतात. परंतु पैशांचे सुयोग्य नियोजन नसल्यामुळे अनेक जण वर्षानुवर्षे गरिबीत खितपत पडतात. पैसा गुंतवणूक, योग्य वापर आणि त्याच्या वाढीचे प्रयत्न यावर आर्थिक गणित बदलत असते. म्हणून पैसा नुसता कमवून उपयोग नाही तर तो योग्य प्रकारे वापरताही आला पाहिजे.
>>ज्यांची कठोर परिश्रमाची तयारी असते, तिथे लक्ष्मी कधीही पाठ दाखवत नाही. उलट ती त्याच्या पाठीशी कायम उभी राहते आणि त्याच्या नोकरी, व्यवसायात आर्थिक वाढ होईल असा आशीर्वाद देते!