Guru Pradosh Shivratri Vrat March 2025: मराठी वर्षाची सांगता होत आहे. फाल्गुन महिना सुरू आहे. मराठी वर्षाची सांगता होताना अतिशय शुभ फलदायी मानले गेलेले प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रि व्रत गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी येणे शुभ मानले गेले आहे. गुरुवारी प्रदोष व्रत आले असल्यामुळे याला गुरु प्रदोष म्हटले जाते. या दिवशी महादेव शिवशंकर आणि दत्तगुरु, दत्तावरांचे विशेष पूजन, नामस्मरण करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. कोणते उपाय करणे उपयुक्त ठरू शकेल? जाणून घेऊया...
सर्व दोषातून मुक्त करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत आणि भगवान महादेवाची प्रिय तिथी म्हणजे शिवरात्रि एकाच दिवशी येणे सामान्य मानले जात नाही. कमीवेळा असा योग जुळून येतो. प्रदोष व्रत हे अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते.
‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त
प्रदोषाच्या दिवशी पूर्ण दिवस उपास करून सूर्यास्ताच्या वेळी शिव पूजन केले जाते. भोलेनाथाला दही भाताचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य गायीला किंवा गरजू व्यक्तीला दान करतात मग घरी येऊन उपास सोडावा, असे करणे अतिशय पुण्याचे मानले गेले आहे. तसेच महादेव शिवशंकरांसह दत्तगुरुंचे, स्वामींचे विशेष पूजन करणे, नामस्मरण करणे, मंत्रांचा जप करणे शुभ मानले गेले आहे. दत्तगुरुंशी संबंधित श्लोक, स्तोत्रे म्हणावीत. किमान १०८ वेळा मंत्रांचे जप करावेत. दत्तगुरुंना, स्वामींना आवडणाऱ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. फळे, फुले अर्पण करावीत. यामध्ये विशेष करून पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा. पिवळ्या रंगाची फुले, मिठाई अर्पण करणे लाभदायी मानले गेले आहे.
गुरु ग्रहाशी संबंधित गोष्टी करा, गुरुबळ मिळवा
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह याचे कुंडलीतील स्थान आणि प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. गुरु प्रदोषच्या दिवशी महादेव, दत्तगुरुंसह गुरु ग्रहाची उपासने केल्यास कुंडलीतील स्थान मजबूत होणे, गुरुबळ मिळणे, गुरु ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यास मदत होणे असे अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, हा नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र आहे. ॐ बृं बृहस्पतये नम:॥, हा गुरुचा बीज मंत्र आहे. तर, ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात॥, हा गुरुचा गायत्री मंत्र आहे. गुरुशी संबंधित वस्तू, पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.