वॉशिंग्टन डी. सी. येथील मराठी कला मंडळाने यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षाचा पल्ला गाठला. काही दशकांपूर्वी अमेरिकेत आलेल्या मराठी लोकांनी मिळून मंडळाची स्थापना केली, तेव्हा हे मंडळ अगदी छोटेखानी होतं. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच कुटुंब होती. त्यांनी जो एकत्रित येऊन आनंदाने कार्यक्रम करण्याचा पायंडा घातला, त्यात नंतर येणाऱ्या प्रत्येकाने मोलाची भरच घातली. त्यामुळेच आज या छोट्या बीजाचं मोठ्या वृक्षात रूपांतर झालेलं आहे.
अशा या फोफावलेल्या परंतु मुळांना घट्ट धरून उभ्या असलेल्या सर्व मराठी माणसांनी मिळून ३१ ऑगस्ट २०२५ रोजी, सुवर्ण महोत्सवाला साजेसा गणेशोत्सव साजरा केला. एक दिवसाचा गणपती उत्सव, पण त्यामध्ये अनेक उल्लेखनीय गोष्टी घडल्या. अध्यक्ष श्री. मिलिंद प्रधान आणि उपाध्यक्ष श्री. विनीत देशपांडे यांच्या कार्यकारिणी समितीने एक देखणा आणि आकर्षक गणेशोत्सव आयोजित केला होता. या उत्सवामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण ठरला तो दगडूशेठ गणपती मंदिराची प्रतिकृती असलेला देखावा. कार्यकारिणी समिती मधील गिरिजा बेंडीगिरी, अमोल देशपांडे, अमित पटवर्धन या तिघांची ही मूळ संकल्पना! ती साकारण्यासाठी केवळ कार्यकारिणी समिती आणि त्यांचे जोडीदार एवढेच नाही, तर अमेरिकेत लहानाची मोठी झालेली त्यांची मुलं देखील सहभागी झाली. १९ फुटी उंच देऊळ केवळ साडेतीन तासात या सर्वांनी मिळून उभे केले. अर्थात त्यासाठी महिनाभर सर्वजण एकत्र येऊन काम करत होते. मंदिरामध्ये विराजमान असलेली श्रींची मूर्ती हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
एवढेच नाही तर, ३ जोडप्यांनी मिळून गणेशाची यथोचित पूजा केली. श्री. सत्यनारायण मराठे गुरुजींनी पूजेत सर्वांना सहभागी करत पौरोहित्य केले. ५००-६०० लोकांनी ढोल झांजांच्या तालावर जोशपूर्ण आरती केली. या कार्यक्रमाला जवळ जवळ १५०० लोकांनी उपस्थिती दर्शवली. रांगेत उभे राहून सर्वांनी दर्शन घेतले. वयस्क लोकांना रांगेत उभं राहण्याची वेळ येऊ नये यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांना प्राधान्य देऊन प्रथम दर्शनाचा लाभ घेऊ दिला. सर्व भाविकांना दर्शनानंतर प्रसाद दिला गेला.
१५०० लोकांना मोदकाचे चविष्ट जेवण मंडळाने दिले. तिथेही ज्येष्ठांना प्राधान्य देण्यात आलं. केवळ अडीच तासात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर “सुवर्ण जल्लोष” हा कार्यक्रम पार पडला. यामधे जवळपास २०० कलाकारांनी सहभाग घेतला होता. पारंपारिक पद्धतीने गाण्यांच्या तालावर नृत्य सादर करण्यात आले. नृत्यामध्ये देखील विविधता दिसून आली. कुणी देवीची रूपं दाखवली तर कुणी गणेशाची! काही सुरेल गायकांनी गणपतीची गाणी गायली. लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी ढोल ताशांच्या तालावर लेझीम आणि झेंडे नाचवत जल्लोष साजरा केला.
यानंतर “देवगर्जना” व “शिवमुद्रा” या ढोल ताशांच्या २ वेगवेगळ्या पथकांनी उत्तम सादरीकरण करत जवळपास १ तासाची मिरवणूक काढली. वातावरण अक्षरशः दणाणून गेले. मिरवणुकीनंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
अशाप्रकारे वॉशिंग्टन डी. सी. च्या मराठी कला मंडळाने अतिशय उत्कृष्ट प्रकारे, परंपरेला अनुसरून, भक्तिभावाने भरलेला, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुवर्ण महोत्सवी वर्षाला साजेसा गणेशोत्सव साजरा केला.