Ganesh Sthapana Shubh Muhurat: भाद्रपदातील गणेश चतुर्थी हा सर्वांच्या परमोच्च आनंदाचा दिवस. या दिवशी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यंदा २०२५ मध्ये गणपतीची कोणत्या शुभ मुहूर्तावर स्थापना करावी? बुधवारी राहु काळ कधी आहे? चंद्रास्त वेळ जाणून घेऊया...
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा हा देव आहे. मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठी वर्षांत गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणारी गणेश चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते.
भाद्रपद महिन्यातील महासिद्धिविनायक चतुर्थी
प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी विनायकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायक चतुर्थी मानली जाते. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. गणेश चुतर्थी दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो. श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता, अशी मान्यता आहे.
गणेश पूजनाला तब्बल साडेतीन हजार वर्षांची परंपरा
सुमारे ३.५ हजार वर्षांपूर्वी गणेश पूजनाला प्रारंभ झाला. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्यास शास्त्रात सांगितले आहे. प्राचीन काळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेशमूर्ती तयार करून तेथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत. त्यानंतर गणेशमूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली.
गणेश चतुर्थी २०२५ ला अद्भूत शुभ दुर्मिळ योग
यंदाची गणेश चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक दुर्मिळ शुभ योगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग, लक्ष्मी नारायण योगही जुळून येत आहेत.
श्री गणेश चतुर्थी: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५
भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०३ वाजून ४३ मिनिटे.
भाद्रपद चतुर्थी मध्यान्हकाल: बुधवारी सकाळी ११:२५ ते दुपारी १:५४पर्यंत
राहु काळ: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता ते दुपारी १ वाजून ३० मिनिटे.
चंद्रास्त वेळ: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्रीणेश चतुर्थी, गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. २७ ऑगस्ट २०२५ पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होईल.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥