यशस्वी लोकांकडे पाहून अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, की यांचे निर्णय कधीच कसे चुकत नाहीत? नाहीतर आम्ही, सतत धडपडतो, चुकतो, ठेचकाळतो. अशाने आम्ही कधी पुढे जाणार? यावर प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांचे सुंदर वाक्य आहे. ते लिहितात, `समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते!'
याचाच अर्थ मोठ्या आणि यशस्वी लोकांकडून चुका होत नाहीत का? तर होतात. परंतु, त्या चुकांवर मात करण्याची किंवा त्यातून उद्भवणारे धोके पत्करण्याची त्यांची तयारी असते. याउलट आपण मात्र, संभाव्य धोक्यांची भीती बाळगून निर्णय घेणेच टाळतो.
निर्णयक्षमता एकाएक वाढत नसते. ती टप्प्याटप्प्याने वाढवावी लागते. यासाठी छोटे छोटे निर्णय घेण्याचा सराव केला पाहिजे. त्यातून आपण शिकत जातो आणि आपला आत्मविश्वास वाढतो.
असे म्हणतात, की वाहन चालवायला शिकलो की आपली आत्मविश्वास वाढतो. परंतु, वाहन चालवण्याच्या कलेने आत्मविश्वास वाढत नाही, तर वाहन चालवताना आजूबाजूच्या वाहनांचा वेध घेऊन आपल्या वाहनाची गती नियंत्रित करत चालवताना आत्मविश्वास दुणावत जातो.
हीच बाब आपल्या आयुष्यातही घडते. आपल्यावर आई बाबांच्या स्वप्नांची जबाबदारी, समाजाच्या चौकटीची जबाबदारी, गुरुजन-मित्रपरिवार यांच्या अपेक्षांची जबाबदारी यांचे एवढे दडपण असते, की आपण स्वत:ची काय स्वप्ने आहेत, तेच विसरून जातो. दुसऱ्यांची स्वप्ने पूर्ण करताना आपल्याला आनंदच मिळणार नसेल तर काय उपयोग? अशा वेळी एक निर्णय, ज्याबाबत तुम्हाला खात्री वाटते, ज्याबाबत तुम्ही ठाम आहात, जो तुम्हाला आयुष्यभर आनंद देईल असे वाटते, तो निर्णय इतरांच्या मनाविरुद्ध असला, तरी तो निर्णय घेण्याचे धाडस दाखवा. त्या यशापयशाची जबाबदारी स्वीकारा.
दरवेळी दुसऱ्यांच्या खांद्यावर आपल्या जबाबदारीचे ओझे न टाकता आपण आपल्या निर्णयाची जबाबदारी घेऊया आणि आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखवूया.