Shree Swami Samarth Siddhivinayak Katha In Marathi: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. मुंबईसह राज्यभरातील अनेक मंडळे वैविध्य आणि वैशिष्ट्यपूर्ण देखावे साकारत असतात आणि ते पाहण्यासाठी भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मुंबईत गणेशोत्सवाचे भव्य स्वरुप पाहायला मिळते. मुंबईत आलेला गणपती भक्त प्रभादेवी येथे श्री सिद्धिविनायक मंदिरात आवर्जून जातोच जातो. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेल्यावर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण अवश्य करावे, असे सांगितले. यामागे एक विशेष अन् खास कारण असल्याचे म्हटले जाते. जाणून घेऊया...
जगभरातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर याचा उल्लेख आवर्जून केला जातो. विनायक चतुर्थी अंगारक योग असो किंवा संकष्ट चतुर्थी अंगारक योग असो श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होतो. प्रत्येक मंगळवारीही नित्य नियमाने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिर अतिशय प्रसिद्ध, लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. हजारो भाविक दररोज सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला येत असतात. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी कामासाठी येणाऱ्या व्यक्ती सिद्धिविनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात. कोट्यवधी भाविकांचे आराध्य श्री स्वामी समर्थ महाराज आणि मुंबईच्या श्री सिद्धिविनायक यांच्यात कालातीत ऋणानुबंध असल्याची एक कथा सांगितली जाते.
स्वामी मला काही नको, माझ्या सिद्धिविनायकाला वैभव द्या
मुंबईत राहणाऱ्या माणसाला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहित नाही, असे शक्यतो होणार नाही. या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. अक्कलकोट स्वामी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात एक अद्भूत बंध होता. स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज जे श्रीगणेशाचे आणि गायत्री मंत्राचे मोठे भक्त होते, त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती, असे म्हटले जाते. असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक स्वामी त्यांना म्हणाले की, रामकृष्णा तुला काय हवे? प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. ते स्वामींना म्हणाले की, स्वामी मला काही नको. तुम्हाला काही द्यायचे असल्यास आपण माझ्या सिद्धिविनायकाला वैभव द्या.
तुझ्यासारखा शिष्य लाभला हे माझेच भाग्य, सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल
हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला. आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत देत राहील. एका मागणीत दोन हेतू साध्य करण्याची कल्पना स्वामींना आवडली. स्वामींनी जांभेकर महाराजांना जवळ घेत आशीर्वाद दिला आणि म्हणाले की, तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझेच भाग्य आहे. तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव. तुझा हा मंदार इंचाइंचाने वाढेल तस तसा तुझा सिद्धिविनायक वाढेल. ज्या दिवशी तो मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल. स्वामींनी तथास्तु म्हटले आणि ते वटवृक्षाच्या दिशेने अंतर्धान पावले.
गजानना श्री स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो, तुला जगात वैभव प्राप्त होवो
चौथ्या दिवशी महाराज प्रभादेवीला आले. प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थना केली की, स्वामी मी माझे काम केले. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. असे बोलून महाराज देवासमोर उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले की, हे गजानना श्री स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो. या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवोत व त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
श्री स्वामी समर्थांचे आशीर्वादाने सिद्धिविनायक मंदिर प्रासादिक झाले
जांभेकर महाराज सेवेला लागले. स्वामी समर्थांबरोबरच्या सहवासातील या काळात जांभेकर यांच्याकडे समर्थांनी असेही भाकित केले की, २१ वर्षांनंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल. त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल. हा शब्द खरा ठरला आणि प्रभादेवीचा सिद्धिविनायक तेव्हापासून खऱ्या अर्थाने सिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. श्री स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले. त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा-जसा बहरत गेला तस तशी सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाली आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताच्या इच्छे खातर प्रभादेवीच्या सिद्धिविनायकालासुद्धा वैभव प्राप्त करून दिले. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रुम झाले हे मानण्यास हरकत नाही, अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते.
सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचेही स्मरण करावे
सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना, बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे, असे सांगितले जाते. सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून, उजव्या हातामध्ये कमळ व वरील डाव्या हातात अंकुश आहे. खालील उजव्या हातात मोत्यांची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र ठेवलेले आहे. गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रूळणारा सर्पहार आहे. दोन्हीं बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पहात असल्याप्रमाणे दिसतात. तसेच सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो, असे म्हटले जाते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥