Diwali 2020: धनत्रयोदशीला करा, धन्वंतरी, महालक्ष्मी तसेच कुबेराची पूजा; जाणून घ्या, तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 10:05 AM2020-11-13T10:05:33+5:302020-11-13T10:09:45+5:30

Diwali 2020 : धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज किंवा देवी महालक्ष्मी यांची विधीवत पूजा करावी. अक्षता, धूप, दीप, चंदन, उटी, पाने, फुले, श्रीफळ देवाला अर्पण करून मंत्रांचे उच्चारण करावे. 

Diwali 2020: Do Dhantrayodashi, worship Dhanvantari, Mahalakshmi and Kubera; Know, dates, muhurats and pooja rituals | Diwali 2020: धनत्रयोदशीला करा, धन्वंतरी, महालक्ष्मी तसेच कुबेराची पूजा; जाणून घ्या, तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

Diwali 2020: धनत्रयोदशीला करा, धन्वंतरी, महालक्ष्मी तसेच कुबेराची पूजा; जाणून घ्या, तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

googlenewsNext

कार्तिक महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या वर्षी धनत्रयोदशीचा दिवस १३ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी आला आहे. समुद्रमंथनातून धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रगट झाले, तो आजचाच अर्थात धनत्रयोदशीचा दिवस. म्हणून अनेक ठिकाणी या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर, आयुर्वेदाचे स्वामी धन्वंतरी, तसेच सुख-समृद्धीची देवता महालक्ष्मी यांची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीची तिथी :
कार्तिक कृष्ण त्रयोदशीचा प्रारंभ द्वादशीलाच, म्हणजे १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ३० मीनिटांनी सुरू होऊन १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ५९ मीनिटांपर्यंत असणार आहे. त्यात आहे, देवी लक्ष्मीचा वार म्हणजे शुक्रवार आल्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. 

पूजेचा मुहूर्त :
धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त केवळ अर्धा तासाचा आहे. सायंकाळी ५ वाजून २८ मीनिटांनी सुरू होऊन ५ वाजून ५९ मीनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे. या वेळेत पूजा पूर्ण झाली नाही, तरी हरकत नाही, परंतु पूजेचा आरंभ या वेळेत अवश्य करावा. धनाची पूजा झाल्यावर सायंकाळी दक्षिणेकडे दिव्याची वात करून एक दिवा यमराजांनादेखील अर्पण करावा आणि अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना करावी.

पूजा विधी : 
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज किंवा देवी महालक्ष्मी यांची विधीवत पूजा करावी. कुबेर महाराजांची पूजा का? कारण, त्यांना धनसंपत्तीचे प्रमुख मानले जाते. भगवान शंकरांनी त्यांना धनपतीचे वरदान दिले आहे. म्हणून धनप्राप्तीसाठी कुबेर महाराजांची पूजा केली जाते. तसेच धन्वंतरी हे आरोग्याची देवता आहेत. आपल्या घरात केवळ संपत्ती येऊन उपयोग नाही, तर ती उपभोगण्यासाठी चांगले आरोग्यही असायला हवे, म्हणून त्यांचीही पूजा. तसेच आपल्या घरातील धन-संपत्ती वृद्धिंगत व्हावी आणि लक्ष्मी चांगल्या मार्गानेच घरात यावी आणि कायमस्वरूपी स्थीर राहावी, म्हणून महालक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षता, धूप, दीप, चंदन, उटी, पाने, फुले, श्रीफळ देवाला अर्पण करून पुढील मंत्रांचे उच्चारण करावे. 

हेही वाचा : Diwali 2020 : जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे....जाणून घेऊया धनत्रयोदशीचे महत्त्व

कुबेर महाराजांच्या पूजेच्या वेळी म्हणावयाचा मंत्र-
ओम श्री, ओम ऱ्हीम, ओम ऱ्हीम, श्री क्लीं वित्तेश्वराय नम:।

धन्वंतरी पूजा मंत्र-
ओम धन्वंतरये नम:।

पूजेच्या वेळी म्हणावयाचे श्लोक : 

ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय
त्रिलोकपथाय, त्रिलोकनाथाय श्री महाविष्णूस्वरूप,
श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नम:।

या देवी सर्वभुतेषु, लक्ष्मीरूपेण संस्थिता,
नम: स्तस्यै, नम: स्तस्यै, नम: स्तस्यै नमो नम:।

हेही वाचा : Diwali 2020 : अकाली मृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशीला करतात दीपदान!

Web Title: Diwali 2020: Do Dhantrayodashi, worship Dhanvantari, Mahalakshmi and Kubera; Know, dates, muhurats and pooja rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी