संत एकनाथ महाराजांनी दत्त गुरूंच्या आरतीत वर्णन केल्याप्रमाणे ते 'दत्त येवोनिया उभा ठाकला' याची प्रचिती दत्त गुरु आपल्या भक्तांना कधी देतील हे सांगता येत नाही. त्यासाठी भक्तही तेवढ्या योग्यतेचा असावा लागतो. गुरूंची कृपा झाली की आपलाच नाही तर पुढच्या पिढ्यांचाही उद्धार होतो आणि गुरु सेवेची परंपरा हस्तांतरित होते, सुरु राहते. अशाच एका दत्तकृपेच्या अनुभवाबद्दल सोशल मीडियावर निनामी वाचनात आलेली माहिती रोचक जाणून घेऊ.
कृष्णापंचगंगा परिसरात श्री नृसिंहसरस्वती महाराज १३६४ ते १३७६ या कालावधी दरम्यान वास्तव्यास होते. या पंचक्रोशीत ते भिक्षा मागण्यास जात असत. असेच ते शिरोळ या ग्रामी गंगाधरपंत कुलकर्णींच्या घरी भिक्षेस दुपारी गेले असता माई भिक्षा वाढा असे म्हणाले.
गृहस्वामिनीने त्यांना नमस्कार केला व चांगले स्वागत करून म्हटले की गृहधनी बाहेर भिक्षेकरिता गेले आहेत कृपया थोडे थांबावे. कुलकर्णीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. मी स्वयंपाक करते असे त्या म्हणाल्या. त्यांच्या घरी जोंधळ्याच्या कण्याशिवाय काही शिल्लक नव्हते. त्याच त्यांनी शिजवल्या, पण त्या वाढायच्या कशावर असा प्रश्न होता. साधी व धड पत्रावळ देखील नव्हती.
महाराजांनी त्यांची अंतर अडचण जाणली, जवळचाच एक पाषाण घेऊन त्यावर प्रोक्षण करून त्यांनी त्यावर प्रणवचिन्ह काढले व भिक्षान्न त्यावर वाढण्यास सांगितले. भक्तवत्सल यतींनी मोठ्या प्रेमाने ते अन्न भक्षण केले व तृप्त होऊन त्यांनी तिला जाताना ह्या पात्राची पूजा करा ४२ पिढ्यांचा उद्धार होईल, दारिद्र्य, दुःख, पीडा नाहीशा होतील, अन्नपूर्णा सदैव वास करेल असा आशीर्वाद दिला. थोड्याच वेळात कुलकर्णी घरी आले व त्यांना घडलेला वृतांत कळाला.
महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना वाईट वाटले. परंतु ज्या पात्रावर महाराज जेवले त्याची त्यांनी पूजा केली. त्या पाषाणावर शंख, चक्र, पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त अशी हाताची पाच बोटे उमटलेली त्यांना आढळली ! हेच ते शिरोळचे भोजनपात्र, या पात्राची पूजा कुलकर्णींच्या घराण्यात वंशपरंपरेने चालत आली आहे. प्रत्येक गुरुवारी पूजा, रात्री श्रीची पालखी आरती इत्यादी कार्यक्रम होतात.
शाही दसरा: दसऱ्याच्या सणाला महाराजांना ५ तोफांची मानवंदना दिली जाते व १२ वर्षांतून येणारे कन्यागत महापर्वकाळ वेळी २१ तोफांची मानवंदना असते. दत्तजयंतीला १० दिवस मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.
!!जय जय भोजनपात्रा सुपवित्रा सप्त ही जल चंद्र पूर्णा न कळे तव सुत्रा !!
!श्रीगुरुदेव दत्त! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!