'प्रयत्नांती परमेश्वर' ही म्हण आपल्याला माहीत आहेच. जो प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी भगवंत उभा राहतो. किंवा बॉलिवूड स्टाईलने सांगायचे तर, 'अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने मे जुड जाती है!' अर्थात याला तुम्ही ईश्वरी शक्ती म्हणा, निसर्ग म्हणा नाहीतर सकरात्मक लहरी म्हणा, कार्यपूर्तीसाठी किंवा कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी तिची गरज लागतेच. म्हणून चांद्रयान ३ च्या लाँचिंगपूर्वी इस्रोचे अधिकारी तिरुपती मंदिरात दर्शनासाठी जाऊन आले.
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ मोहीम चंद्राकडे झेपायला सज्ज झाली आहे. १४ जुलैला दुपारी २.३५ वाजता होणाऱ्या उड्डाणाकडे अवघ्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे. भारताची ही मोहिम यशस्वी व्हावी आणि आंताराळात पुन्हा एकदा भारताचं स्थान बलशाली व्हावं यासाठी देश प्रार्थना करत आहेत. त्यातच. इस्रोचे अधिकारी आज तिरुपती वेंकटचलापथीच्या मंदिरात दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी पोहोचले आहेत. वैज्ञानिकांच्या एका टीमने चांद्रयान ३ चे लहान मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात पूजा केली.
यात अंधश्रद्धा नसून अधिक श्रद्धा आहे, ज्याला आपण शुभाशीर्वाद म्हणतो. परीक्षेला जाताना आपण देवाच्या पाया पडतो आणि मोठ्यांना नमस्कार करतो. तेव्हा ते 'बेस्ट लक' किंवा 'ऑल द बेस्ट' म्हणतात, म्हणजेच तुझ्या परीक्षेसाठी सगळी परिस्थिती बेस्ट अर्थात अनुकूल होऊ दे. चांद्रयान मोहिमेच्या उड्डाणाप्रसंगी आपल्या वैज्ञानिकांचीसुद्धा हीच अपेक्षा असावी. सर्व प्रयत्न केलेले आहेत, फक्त ते सफल होण्यासाठी लागणारी अनुकूल स्थिती या प्रकल्पाला लाभावी.
संपूर्ण देश या मोहिमेकडे डोळे लावून आहे, त्यात तिरुपतीचेही आशीर्वाद लाभले आहेत, आता आपणही मनापासून शुभेच्छा देऊया. जेणेकरून चंद्रावर यशस्वी लॅण्डिंग झाल्यास भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरेल. २३ ऑगस्टनंतर कधीही हे यान चंद्रावर उतरू शकते.