Chaitra Sankashti Chaturthi April 2025: हिंदू नववर्षाचा पहिला चैत्र महिना सुरू आहे. चैत्रात अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये उत्साहात साजरी केली जातात. चैत्र महिन्यात अनेक योग, राजयोग जुळून आले. या शुभ योगांमध्ये व्रत-वैकल्ये असल्याने याचे महत्त्व आणखी वाढले. संकष्ट चतुर्थीलाही मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. तसेच काही राजयोगही जुळून आलेले आहेत. मराठी नववर्षाच्या चैत्र महिन्यातील पहिले संकष्ट चतुर्थी व्रत कधी आहे? या व्रतात काय करावे? चंद्रोदयाची वेळ काय? जाणून घेऊया...
गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते.
चैत्र संकष्ट चतुर्थी: बुधवार, १६ एप्रिल २०२५
चैत्र वद्य चतुर्थी प्रारंभ: बुधवार, १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून १६ मिनिटे.
चैत्र वद्य चतुर्थी समाप्ती: गुरुवार, १७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०३ वाजून २३ मिनिटे.
भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे बुधवार, १६ एप्रिल २०२५ रोजी संकष्ट चतुर्थी साजरी होणार असल्याचे सांगितले जात आहे. सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे, असे म्हटले जाते.
चैत्र संकष्ट चतुर्थी व्रत पूजा विधी
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
| शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
| मुंबई | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
| ठाणे | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
| पुणे | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
| रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
| कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
| सातारा | रात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे |
| नाशिक | रात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे |
| अहिल्यानगर | रात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे |
| धुळे | रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे |
| जळगाव | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
| वर्धा | रात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे |
| यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे |
| बीड | रात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे |
| सांगली | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
| सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
| सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
| नागपूर | रात्रौ ०८ वाजून ३० मिनिटे |
| अमरावती | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
| अकोला | रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे |
| छत्रपती संभाजीनगर | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
| भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ४४ मिनिटे |
| परभणी | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
| नांदेड | रात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे |
| धाराशीव | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
| भंडारा | रात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे |
| चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून २७ मिनिटे |
| बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
| मालवण | रात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे |
| पणजी | रात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे |
| बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे |
| इंदौर | रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे |
| ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे |
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||