Sitamarhi Janaki Mandir: अयोध्येत भव्य राम मंदिरात भाविकांचा ओघ सुरूच आहे. राम मंदिराचे लोकार्पण झाल्यापासून सुमारे १६ कोटी भाविकांनी अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतल्याचे म्हटले जात आहे. राम मंदिरातील पहिल्या मजल्यावर भव्य श्रीराम दरबार भरवण्यात आला आहे. तर राम मंदिर परिसरात अनेक मंदिरे बांधली जात आहेत. यातच आता सीतामढी येथे सीतामाईचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. ०८ ऑगस्ट रोजी जानकी मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे.
सीतामढी येथील पुनौरा धाम येथे भव्य जानकी मंदिराची पायाभरणी केली जात आहे. हे मंदिर केवळ बिहारसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक दृष्ट्या अभिमानाचा क्षण असेल, असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे या जानकी मंदिराची उंची अयोध्येतील श्रीराम मंदिरापेक्षा फक्त ५ फुटांनी कमी असणार आहे. ज्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधले आहे, तेच वास्तुरचनाकार जानकी मंदिराचे आरेखन करणार आहेत.
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण
जानकी मंदिर बांधण्याचा खर्च ८८२.८७ कोटी रुपयांपर्यंत अपेक्षित आहे. ऑगस्ट २०२८ पर्यंत जानकी मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच ही योजना तयार केली जात आहे. मोठ्या मंदिराव्यतिरिक्त, त्यात धर्मशाळा, निवास व्यवस्था, सांस्कृतिक केंद्र आणि यात्रेकरूंसाठी प्रवास सुविधा असणार आहेत. जानकी मंदिर हे देश आणि परदेशातील धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची बिहार सरकारची योजना असल्याचे म्हटले जात आहे.
बिहार राज्य धार्मिक न्यास परिषदेचे अध्यक्ष प्रा. रणवीर नंदन म्हणाले की, ८ ऑगस्ट हा दिवस केवळ एक तारीख नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा, संस्कृतीचा, शक्तीच्या परिचयाचा एक मोठा दिवस ठरेल. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्यातील मोठ्या मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी केले जाणार आहे. पुनौरा धाम ही तीच पवित्र भूमी आहे जिथे राजा जनक यांना नांगरणी करताना सीतामाई प्रथम दृष्टीस पडल्या.
दरम्यान, पुनौरा धामचा परिसर ५१ हजार दिव्यांनी प्रकाशमान केला जाईल. यानिमित्ताने मठ आणि मंदिरांमध्ये वैदिक मंत्रांचे पठण आणि विशेष पूजन केले जाणार आहे. हे जानकी मंदिर महिला शक्ती, त्याग, प्रतिष्ठा आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या माता सीतेला समर्पित असेल. या माध्यमातून बिहारची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर दाखविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. पुनौरा धामचे हे जानकी मंदिर सीता जन्मभूमीला अयोध्येच्या राम मंदिराच्या भव्यतेइतकी एक नवीन ओळख देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.