2024 Last Margashirsha Shani Pradosh Vrat Puja Vidhi In Marathi: २०२४ ची सांगता होत आहे. वर्ष संपताना शनि प्रदोष व्रत आचरले जाणार आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यातील शनि प्रदोष व्रत शनिवार, २८ डिसेंबर २०२४ रोजी आहे. ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्यांनी हे व्रत नक्की करावे, असे सांगितले जाते. शनिप्रदोष व्रत कसे करावे? शनिप्रदोष व्रतात शिवपूजनाचे महत्त्व काय? जाणून घ्या, सविस्तर...
शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. काही मान्यतांनुसार, शनी देव महादेवांना आपले गुरु मानतात. त्यामुळे शनिप्रदोषच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे. शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. शनिप्रदोष व्रत केल्यास समस्या, संकटे दूर होऊ शकतात. शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
कसे करावे शनि प्रदोष व्रत?
प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. शनिप्रदोष व्रत मनापासून आचरल्यास तसेच महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते आणि मानसिक शांतीसोबतच शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते.
शिवपूजनासह शनि उपासना करावी
शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. या प्रदोष काळात शिवपूजन केल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी. शनिप्रदोष व्रतात तिन्हीसांजेला शिवपूजन, शनिपूजन झाले की, हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनी देवाचे पूजन करण्यासह शनीदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनी देवांचे दर्शन घेणे चांगले मानले जाते.
साडेसाती असणाऱ्यांनी कोणते उपाय करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल?
आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. साडेसाती सुरू असलेल्यांनी शनिप्रदोष काळात काही गोष्टी अवश्य कराव्यात, असे सांगितले जाते. शनिप्रदोष व्रताचरण करताना महादेवांच्या शिवलिंगावर १०८ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. शनिवारी हे करणे शुभ मानले जाते. यासोबतच यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तुंचे दान करावे. साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाभप्रद ठरते. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे. ११ वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो.