बीडः तुम्ही मागास झालात ना ? तर आता जरांगे यांना माझे सांगणे आहे. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आलात. तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता पहिले ११ विवाह आपआपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आल्याने आता जातपात राहिली का? पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? त्यामुळे ११ विवाह जाहीर करू, असे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके शुक्रवारी रात्री भर सभेत म्हणाले. ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्तावच त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर यावेळी मांडला. शिरूर तालुक्यातील श्रृंगारवाडीत शुक्रवारी रात्री आयोजित ओबीसी महाएल्गार मेळाव्यात प्रा. हाके हे बोलत होते. आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावरही त्यांनी टीका केली.
दरम्यान ओबीस-मराठा समाजात एकमेकांच्या भाषेतून द्वेष निर्माण होत आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.