जिल्ह्यातील ५ हजार ६८१ संशयितांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यात ४ हजार ६१९ अहवाल निगेटिव्ह आले तर १ हजार ६२ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये सर्वाधिक २२३ रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निष्पन्न झाले, त्यापाठोपाठ बीड तालुक्यात २२०, आष्टी १९३, केज १०६, धारूर ३०, गेवराई ६४, माजलगाव ३४, परळी ७५, पाटोदा ५३, शिरूर ४५ आणि वडवणी तालुक्यातील १९ जणांचा समावेश आहे. तसेच रविवारी आरोग्य विभागाकडे ११ मृत्यूची नोंद झाली. यामध्ये केज तालुक्यातील बोरगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाईच्या प्रशांतनगरमधील ४५ वर्षीय पुरुष, बीड तालुक्यातील नेकनूर येथील ३५ वर्षीय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील ६९ वर्षीय पुरुष, राजेवाडी येथील ४० वर्षीय पुरुष, पिंपळा येथील २१ वर्षीय पुरुष, वांगी येथील ६८ वर्षीय पुरुष, बीड तालुक्यातील शिरापूर धुमाळ येथील ६० वर्षीय महिला, शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथील ६५ वर्षीय महिला, बीड तालुक्यातील जरूड येथील ७० वर्षीय महिला आणि शिरूर कासार येथील ८० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३२ हजार ३४० झाली असून २८ हजार १३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आजपर्यंत ७०९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती जि.प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.