माजलगाव : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम होऊन एक वर्ष उलटले असताना केवळ फर्निचरअभावी हे कार्यालय धूळखात पडून आहे. माजलगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू होऊन ८-१० वर्षे उलटली मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांवर येथील तहसील कार्यालयात बसून कारभार पाहण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी उपविभागीय कार्यालयासाठी केवळ तीनच खोल्या असून त्यापैकी एक खोली ही उपविभागीय अधिकारी व दोन खोल्यांत कर्मचाऱ्यांसह सर्व प्रकारची कागदपत्रे ठेवण्यात येतात. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना साधे उभा राहणेही अवघड बनले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयास अनेक वर्षे जागाच मिळत नसल्यामुळे शेवटी तहसील कार्यालयासमोरील बाजूस असलेल्या मंगलनाथ मंदिर व कदम देवी मंदिराच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या खड्ड्यात हे कार्यालय चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यालयाचे बांधकाम मागील दोन- अडीच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. हे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास एक वर्ष उलटले असून केवळ फर्निचरअभावी हे काम अर्धवट राहिल्याने सध्या या कार्यालयात धूळ साचली आहे.
तहसीलला जागा अपुरी
येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी कार्यालय चालू असल्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जागा कमी पडू लागली आहे. यामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या कामात व्यत्यय निर्माण होत आहे.