भारतभूषण क्षीरसागर : जागेसाठी नगराध्यक्षांना निवेदन
बीड : शहरात मराठा समाजाला सकल मराठा भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी कॅनॉल रोडवरील सिंहगड लॉन्स येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी न.प.च्या माध्यमातून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिले आहे.
सदरील जागेवर मराठा समाजाच्या वतीने सार्वजनिक वाचनालय, ई लायब्ररी, सांस्कृतिक बैठकीसाठी हॉल तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या समाज बांधवास राहण्यासाठी वसतिगृह उभारण्याच्या दृष्टीने सदरील जागेवर बांधकाम करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या वतीने बीडमध्ये अनेक सामाजिक सभागृहे उपलब्ध करून दिली असून, सकल मराठा भवनसाठी देखील जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष बोलताना म्हणाले की, समाजकार्य करताना सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे. शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे उभे केले. अनेक सभागृहे उपलब्ध करून दिली. मराठा समाजाच्या मागणीवरून जिजाऊंच्या पुतळ्याची मागणी पूर्ण करून मराठवाड्यातील पहिला पुतळा बीड शहरात उभा केला. मल्टीपर्पज ग्राऊंडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले. मराठा समाजाचे विविध प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून सोडविले. यावेळेस देखील मराठा समाजातील मुला- मुलींसाठी मराठा सकल भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच हे भवन तीन मजली बांधून त्यात सभागृह, वसतिगृह आणि अभ्यासिका बनवण्यात यावे अशी सूचना देखील केली. चांगल्या विकास कामासाठी सतत तत्पर राहणार असल्याचे सांगत सकल मराठा भवनसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल व एका वर्षामध्ये शहरात सुसज्य भवन उभारण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीला मराठा समाजातील विविध पक्षातील, क्षेत्रातील मराठा बांधव उपस्थित होते.