आष्टी : शासनाने तालुक्यातील टाकळसिंग येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला; मात्र गावात अवमेळ असल्याने शाळा बांधायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी गावात शाळेसाठी आलेला निधी चक्क परत गेला आहे. गावकऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने आ. बाळासाहेब आजबेे यांनी निधी रद्द करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे अन् चर्चेत असणाऱ्या टाकळसिंग येथे स्व.आसराजी अण्णा जगताप यांनी ही शाळा १९५० साली स्थापन केली. परिसरातील तब्बल नऊ ते दहा गावातील विद्यार्थी आजपर्यंत शिक्षण घेत आहेत; मात्र सध्या या शाळेची इमारत अतिशय जुनी झालेली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत नवीन दोन मजली इमारत बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे; मात्र गावात शाळा बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने शाळा उभारणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही गावकऱ्यांच्या मते तळ्याच्या पट्टीत शाळा उभी करावी तर काही गावकरी गावात शाळा असावी या मताचे आहेत. या पेचात शाळेसाठी आलेला निधी दीड वर्षे होऊनही तो खर्च न केल्यामुळे आता परत गेला आहे. एकीकडे अनेक गावातील गावकरी शाळेसाठी गावाच्या विकासासाठी शासनाकडून निधी मागत आहेत; मात्र टाकळसिंग गावात शाळेसाठी आलेला निधी गावकऱ्यांच्या अवमेळामुळे परत गेला आहे. गावात खंडीभर पुढारी आहेत पण एकमेकांत ताळमेळ नसल्यामुळे अडचण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
तळ्याच्या पट्टीतच शाळा योग्य राहील
मी गावचा उपसरपंच असताना पाच वर्षांपूर्वी शाळेला तळ्याच्या पट्टीत पाच एकर जागा मिळवून दिलेली आहे.नवीन शाळा बांधायची म्हटले तर मैदान आणि शाळा प्रशस्त असायला पाहिजे. त्यामुळे ही शाळा व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. गावापासून हे अंतर अवघ्या सातशे मीटर आहे त्यामुळे इथं शाळा झाली तर सर्वांसाठी योग्य राहील असे सरपंच सुलोचना जोगदंड आणि माजी उपसरपंच बद्रिनाथ जगताप म्हणाले.
निधी रद्दबाबत आमदारांचे पत्र
पत्र
टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, परंतु ज्या जागेवर इमारत आहे, त्या जागेवर इमारत होत नसल्याने तसेच दुसऱ्या नवीन जागेवर इमारत उभी करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांमध्ये एकमत होत नसल्यामुळे हा निधी परत करण्यात यावा असे पत्र आ. बाळासाहेब आजबे यांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.