अमोल जाधव
नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगल कार्यालये, सिनेमागृह, सामूहिक विवाह सोहळे, सभा धार्मिक कार्यक्रम यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. असे असताना जिल्ह्यातील आठवडी बाजारात कोणतेच नियम पाळले जात नाहीत.
कार्यक्रमाच्या दहापट गर्दी करून ग्रामीण भागात बाजार भरून गर्दी केली जाते; परंतु त्यांना सूचना द्यायला किंवा सांगायला कोणीच नसते. नांदुरघाट येथे मंगळवारी आठवडी बाजार होता; परंतु बाजारात बहुतांश व्यापाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. ते पाहून बाजारात परिसरातील आलेले लोक हे विना मास्क व गर्दी करून दिसले. त्यामुळे आज दिवसभर नांदुरघाटचा बाजार फूल होता; परंतु मास्कबाबत प्रत्येक माणूस गूल होता. नांदूरघाटच्या आठवडी बाजारात ग्रामपंचायतने कोणतेच नियोजन अथवा सूचना केल्याच्या दिसून आल्या नाहीत. शहरामध्ये नगर परिषद मास्क नसेल तर दंड पोलिसांच्या मदतीने वसूल करत आहे व सवय लावत आहे. लॉकडाऊन पडल्यावर गोरगरिबांचे मोठे व व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने बाजारामध्ये कडक नियम करून सवय लावायला पाहिजे. गर्दी असली तरी त्या ठिकाणी प्रत्येक जण मास्क लावून बोलला तर संसर्ग पसरण्याचा धोका कमी होईल जर अशीच निष्काळजी स्थानिक पातळीवर झाली तर रोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल व पुन्हा नियंत्रणात येणार नाही.