केजमध्ये महिला आक्रमक; आंदोलनाचा इशारा
केज : शहरातील मंगळवार पेठेसह शनी मंदिर गल्लीसह परिसरातील नळाला मागील
पंधरा दिवसांपासून पाणी येत नाही. पाणी
कधी येणार याची विचारणा करणाऱ्या महिलांना संबंधित कर्मचारी अरेरावीची भाषा वापरत
आहेत. त्यामुळे या भागातील महिला पाण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत.प्रसंगी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
केज शहराला धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र
मागील काही महिन्यांपासून शहरात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने पाणी आणायचे कोठून असा प्रश्न शहरातील महिलांना पडला आहे. त्यातच पाणी नळाला कधी येणार
याची विचारणा करणाऱ्या महिलांना नगर पंचायतच्या कर्मचाऱ्याकडून अरेरावी होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चालू असल्याने घरात स्वयंपाकासह सांडण्यास लागणारे पाणी आणायचे कोठून असा संतप्त सवालहि महिलांनी केला
आहे.
पाणी नाही तर पाणीपट्टी नाही
मांजरा धरण भरलेले असतानादेखील कधी वीज तोडल्याने तर कधी पाईपलाईन
फुटल्याचे कारण देत नगरपंचायत पंधरा पंधरा दिवस पाणी सोडत नाही. मात्र
पाणीपुरवठा न करता नगर पंचायत पाणीपट्टीची वसुली करते. पाणी नाही तर पाणीपट्टी नाही अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. नगरपंचायतने नळाला पाणी न
सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनीषा आगरकर ,आशाबाई घाडगे तारामती
सत्वधर यांच्या सह शहरातील महिलांनी दिला आहे