बीड : शासकीय कार्यालयाच्या भिंतींवर ‘येथे थुंकू नये’ अशा सूचना लिहिलेल्या असतात; परंतु त्याच शासकीय कार्यालयातील कर्मचारी व कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते. परिणामी भिंती रंगलेल्याच दिसतात. यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
नद्यांतून वाळू उपसा
बीड : तालु्क्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिप्परने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे संबंधित महसूल विभाग व नेकनूर पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा वाळूचा उपसा बंद करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
आंब्यावरही परिणाम
माजलगाव : काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. थंडीत पावसाचे वातावरण झाले आहे. याचा परिणाम पिकांवर तर होत आहे, त्याचबरोबर फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्यावरही होत आहे. या वातावरणामुळे बहरात आलेला आंब्याचा मोहोर गळू लागला आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसत असून, फळबागायतदार शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे दिसून येत आहे.
पीक कोळपणी सुरू
बीड : रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, करडई ही पिके जोमात बहरली आहेत. हरभऱ्याची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने हरभऱ्याची कोळपणी सुरू आहे. ज्वारीचे पीकही चांगले बहरले असून, ज्वाऱ्या आता पोटऱ्यामध्ये येत आहेत. रब्बी हंगाम चांगला बहरल्याने शेतकरी पिकांना पाणी देणे, ऊस लागवड, भाजीपाला लागवड यात गुंतले आहेत. अनेकांचे खळे, मळणी झाली आहे.
नियमांची पायमल्ली
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
ग्रामीण भागातील बस सुरू कराव्यात
आष्टी : तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना बाजारपेठेच्या ठिकाणी येण्यासाठी बस उपलब्ध नाहीत. सध्या खासगी वाहनेही कमी प्रमाणात जातात. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर तासनतास बसावे लागत आहे. विविध खेड्यापाड्यातून कोणत्याही गाडीला हात करून ताटकळत उभे राहावे लागत आहे. खेड्यापाड्यातील लोकांची परिस्थिती पाहता बस सेवा सुरू करून प्रवाशांचे हाल थांबावेत, अशी मागणी आहे.