केज ( बीड) : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी प्रशासनासमोर ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास देशमुख कुटुंबियांसह समस्थ गावकरी दि. 25 फेब्रुवारी पासून उपोषणावर ठाम आहेत. उपोषणापासून गावकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी आलेल्या मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी गावाकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवीला आहे. दरम्यान, उपोषण टाळायचे असेल तर चार दिवसांत सर्व मागण्या मान्य करा, असा अल्टीमेटम ग्रामस्थांनी आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर प्रशासनास दिला.
मनोज जरांगे पाटील यानी आज सकाळी ११ वाजता मस्साजोग येथे देशमुख कुटुंबिय आणि समस्त गावकऱ्यांची भेट घेतली. उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी जरांगे यांनी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांसोबत तब्बल २ तास सर्वांशी संवाद साधला. गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी मदत करणारे पोलीस कर्मचारी- अधिकारी आणि आसरा, गाड्या आणि पैसा पुरविणाऱ्यांचा या प्रकरणात सहभाग आढळूनही अनेक जणांना सहआरोपी करण्यात आले नाही, याबाबत मनोज जरांगे पाटील आणि ग्रामस्थांनी नापसंती व्यक्त केली. तसेच प्रशासनाच्यावतीने देशमुख कुटुंबियांची एखाद्या मंत्र्यांनी भेट घ्यावी. त्यांना आधार आणि विश्वास द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचा डाव उधळला...सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची क्रूरपणे हत्या केल्या नंतर त्यांना बदनाम करुन कळंब येथील एका महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी त्यांची हत्या झाली अशी दिशाभूल व हुलकवानी या प्रकरणाला देण्याची पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचे पार्थिव असलेली जीप कळंब रस्त्याने वळवीली होती. या जीप मधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सीडीआर काढून त्यांना सहआरोपी केले पाहिजे. कळंब येथील ती महिला कोण. हे ही जनतेसमोर आले पाहिजे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे भूमिका मांडली.
200 हून अधिक सह आरोपी आहेत...मनोज जरांगेपाटील, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि समस्त गावकरी यांनी गुन्हेगारांना या प्रकरणी 50 पोलीस व अधिकाऱ्यांसह 200 हून अधिक लोकांनी विविध प्रकारचे सहकार्य केले आहे. या सर्वांना सहआरोपी करुन त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या मागणीवर सर्वजण ठाम आहेत.
सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वांचा 100 टक्के विश्वास होता. परंतु विविध चौकशी समित्या नेमण्याशिवाय त्यांनी या प्रकरणी काहीही केलेले नाही. त्यांनी आदेश दिल्यानंतर 50 पोलिसांसह 200 हून अधिक सह आरोपीवर कारवाई होईल असे वाटले होते. परंतु या प्रकरणांशी संबंधित मंत्री धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्री मंडळात आहेत. तोपर्यंत सहआरोपीवर कारवाई होऊ शकत नाही. त्यासाठी धनंजय देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतरच या प्रकरणी आपल्याला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. गुंड पोसायचे, सांभाळायचे त्यांना अभय द्यायचे याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, अशा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
या मागण्यांवर ठाम: केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सह आरोपी करा. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा. अॅड. उज्वल निकम यांची या प्रकरणी नियुक्ती करुन हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे. सर्व आरोपी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांचे सीडीआर तपासून दोषींना सहआरोपी करा. या मागण्यांवर गावकरी ठाम असून त्यासाठी सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.