राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई येथील निरीक्षकांच्या पथकाने शहरालगत असणाऱ्या बुट्टेनाथ दरी परिसरातील गावठी दारू अड्डा उद्ध्वस्त केला. रविवारी सकाळी धाड टाकून केलेल्या कारवाईत १ लाख १४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण चार गुन्हे दाखल केले.
सध्या ग्रामपंचायत निवडणूक निमित्त आदर्श आचारसंहिता सुरू आहे . तसेच ३१ डिसेंबर ही वर्षपूर्ती व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर कारवाया सुरू आहेत. अवैधरित्या गावठी मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुट्टेनाथ दरी व परिसरात गस्तीवर असताना केलेल्या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवले आहेत.या कारवाईत ४६०० लिटर रसायन,२०० लिटरचे २३ बॅरल,२ टोपली असा एकूण १ लाख १४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिशय दुर्गम ठिकाणी केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड,दुय्यम निरीक्षक ए.एन.पिकले,जवान बी.के.पाटील,जवान तसेच वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.