आरोग्य विभागाचे नियोजन : जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांवर शिबीर
बीड : जिल्ह्यात असलेल्या ऊसतोड कामगार महिला व त्यांच्या मुलांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. यासाठी जिल्ह्यातील सातही साखर कारखान्यांवर शिबीर घेतले जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्रही काढले आहे.
जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजूर परजिल्ह्यातील कारखान्यावर गेलेले आहेत. त्यांची जातानाच आरोग्य तपासणी करण्यात आली होती, तसेच आता बीड जिल्ह्यातील माजलगाव २, परळी १, गेवराई १, धारूर १, केज १ व अंबाजोगाईतील १, अशा सातही साखर कारखान्यांवर काम करणाऱ्या ऊसतोड महिलांची व त्यांच्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष शिबीर घेण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत तात्काळ नियोजन करून तारीख व अहवाल कार्यालयास कळविण्यासही डॉ. पवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या शिबिरासाठी १५ हजार रुपयांचे अनुदान आहे. याअंतर्गत किरकोळ आजार असलेल्या महिला, बालकांवर तात्काळ उपचार करून औषधी दिली जाणार आहेत. गंभीर आजार असणाऱ्यांना ग्रामीण, उपजिल्हा अथवा जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाणार आहे. तसे नियोजनही आरोग्य विभागाने केले आहे. यासाठी रुग्णवाहिकांचीही व्यवस्था असणार आहे. जास्तीत जास्त महिला, बालकांसह पुरुषांनीही या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. पवार यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.