उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
अंबाजोगाई : अंबाजोगाई ते लातूर या मुख्य रस्त्यावर साखर कारखाना परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. अंबाजोगाई ते लातूर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मोठ्या गतीने पूर्ण झाले. हा रस्ता आता सुसाट वाहनांना धावण्यासाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, या मुख्य रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. या कामाला गती देऊन हे काम लवकर मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
वाहनचालकांचा विनामास्क प्रवास
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशी स्थिती असतानाही शहर व परिसरातील वाहनचालक, रिक्षाचालक, अॅटोरिक्षा, कारचालक, दुचाकी चालक, असे अनेक वाहनचालक विना मास्क प्रवास करतात. वाहनचालकांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने वारंवार देण्यात आल्या. तरीही या सूचनांकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासनाने या संदर्भात ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वीज बिलांच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात वीज बिलांबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी वापर नसतानाही अधिकची बिले वीज ग्राहकांना दिली जात आहेत. तर अनेक ठिकाणी मीटर चालू नसतानाही मोठमोठे रीडिंग दाखवून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले मिळू लागली आहेत. ही वाढती वीज बिले कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गर्दी होत आहे.
ग्रामीण भागातील भाजीपाला रस्त्यावर
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात विविध भागात पिकविला जाणारा भाजीपाला सध्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अंबाजोगाई तालुक्यातून दोन मुख्य राज्य रस्ते निर्माण झाल्याने शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला घेऊन बसत आहेत. रस्त्याने येणारे-जाणारे प्रवासी ताजा भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे शेतक-यांना हे नवीन रस्ते बाजारपेठ म्हणून उपलब्ध झाले आहेत.
निवडणूक आचारसंहितेचे पालन करा
अंबाजोगाई : अंबाजोगाई उपविभागात अंबाजोगाई व केज तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. इतरही चार दिवस विविध छाननी, उमेदवारांना चिन्ह वाटप करणे अशा प्रक्रिया सुरूच राहणार आहेत. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन ग्रामस्थांनी करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केले आहे.