आष्टी : तालुक्यात शनिवारी रात्री झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेल्या डाळिंब, आंबा, द्राक्ष फळबागा वादळी वाऱ्याने अक्षरशः आडव्या झाल्या तर लगडलेल्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला. या बागांबरोबरच कांदा, गहू, मका या काढणी सुरु असलेल्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.
तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, आंबा, डाळिंब, द्राक्षांच्या बागांमध्ये काढणीला आलेल्या फळांचा झाडाखाली खच पडला आहे. तालुक्यात कलमी आंब्याच्या, चिकूच्या बागा आहेत. द्राक्ष हंगामही अंतिम टप्प्यात आहे. या बागांना अवकाळीचा फटका बसला आहे. गहू, कांदा, हरभरा या पिकांची शेतकऱ्यांची काढणी सुरु असून, कोरोनाचे संकट असतानाच स्वच्छ असणाऱ्या आकाशात रात्रीपासून अचानक ढग दाटून आले व रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या आसपास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पीक होत्याचे नव्हते झाले. कऱ्हेवडगाव येथील राम नागरगोजे यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील छत वादळी वाऱ्याने उडून गेले. सुदैवाने अन्य कोणतीही हानी झाली नाही. आंधळेवाडी येथील कैलास आंधळे यांची ५ एकरवरील केशर आंब्याची ५०० झाडांची बाग व १२ एकरवरील डाळिंबाची ४,५०० झाडे, १ एकरवरील दोडका तसेच २२ लाखांच्या पाॅलिहाऊसचे नुकसान झाले आहे. याच परिसरातील राजेश रघुनाथ कराड, भाऊसाहेब मारुती आंधळे, रावसाहेब मारुती आंधळे, बाबासाहेब मारुती आंधळे, द्वारकाबाई मारुती आंधळे, मारुती वनाजी आंधळे यांच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे.
२५ लाखांपेक्षा जास्त नुकसान
माझ्या शेतातील ५ एकरावरील आंब्यांच्या झाडाचे ४ टन आंबे खाली पडले आहेत, यात ४ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे तर डाळिंबाचे ५ लाखांपेक्षा जास्त, १ एकर क्षेत्रावरील दोडक्याचे ५ ते ६ लाखांचे तर १ एकरवरील २२ लाख रुपयांच्या नवीन केलेल्या पाॅलिहाऊसमध्ये लावलेल्या लाल, पिवळ्या मिरचीचे नुकसान झाले आहे. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या बागा व लाखो रुपये खर्च केल्यानंतर ऐन तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. सरकारने तत्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी.
- कैलास आंधळे, प्रगतशील शेतकरी, आंधळेवाडी
===Photopath===
110421\img-20210411-wa0385_14.jpg~110421\img-20210411-wa0376_14.jpg
===Caption===
आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंब्यांच्या झाडांना लगडलेल्या कैऱ्यांचा सडा पडला तर पॉली हाऊसचे नुकसान झाले.