- संतोष स्वामीदिंद्रुड (बीड): 'यशाचा मार्ग संघर्षातून जातो,' हे धारूर तालुक्यातील संगम येथील सुपुत्र श्रीकांत दत्तात्रय होरमाळे याने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. शालेय जीवनात बारावीच्या परीक्षेत तीनदा नापास झालेल्या, दोन वर्षे शेतीमध्ये राबलेल्या या तरुणाने हार न मानता तब्बल अकरा वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत १४० वी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या उत्तुंग यशाने संगम गाव अक्षरशः आनंदात न्हाऊन निघाले आहे.
शाळेत सरासरी गुणवत्ता असलेल्या श्रीकांतला बारावीत अपयश आल्यानंतर त्याने शैक्षणिक क्षेत्रात काहीच करू शकत नाही, असे समजून दोन वर्षे शेतात काम केले. मात्र, त्याचे मोठे भाऊ, प्राध्यापक गणेश होरमाळे यांनी समुपदेशन करून त्याला स्पर्धा परीक्षेचा मार्ग दाखवला. भावाच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रीकांतने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या प्रवासातही त्याला अनेकदा अपयश आले, पण त्याने खचून न जाता अभ्यास सुरू ठेवला. गेल्या अकरा वर्षांपासून पुण्यात राहून त्याने पूर्ण वेळ अभ्यासाला वाहून घेतले. अखेर, मे महिन्यात झालेल्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आणि श्रीकांतने राज्यात १४० वी रँक मिळवला. आता शेतीत राबलेल्या श्रीकांतला वर्ग १ चा अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे.
'तू फक्त अभ्यास कर, बाकीची चिंता नको'श्रीकांतची आई अयोध्या दत्तात्रय होरमाळे यांनी मुलाच्या यशानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. "बारावीत नापास झाल्यावर तो खूप खचला होता, पण आम्ही त्याला धीर दिला. फक्त अभ्यास कर, बाकीची चिंता करू नकोस, असे सांगितले. गेल्या ११ वर्षांत तो कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात आला नाही. मुलाने शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले, मला त्याचा खूप अभिमान वाटतो," असे त्या गहिवरून म्हणाल्या.
प्रामाणिकपणे सेवा करण्याची ग्वाहीमोठे कष्ट करून हे यश मिळवले असून, आता अडल्यानडल्यांचे प्रामाणिकपणे काम करत गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सेवा करेल, अशी ग्वाही श्रीकांतने दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय सपाटे यांनी श्रीकांत हा सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या युवकांसाठी मोठा प्रेरणास्रोत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Web Summary : Shrikant Hormale, failing 12th thrice, cracked MPSC after 11 years of struggle. Supported by his brother and family, he secured 140th rank, inspiring many. His mother expressed immense pride in his achievement and dedication.
Web Summary : श्रीकांत होरमाले, जो 12वीं में तीन बार फेल हुए, ने 11 साल के संघर्ष के बाद MPSC पास की। भाई और परिवार के समर्थन से उन्होंने 140वां रैंक हासिल किया, जो कई लोगों के लिए प्रेरणादायक है। उनकी माँ ने उनकी उपलब्धि पर गर्व व्यक्त किया।