पाण्यामुळे चाऱ्याची मुबलकता
बीड : दुष्काळी परिस्थितीमुळे मागील काही वर्षांत चाऱ्याची कमतरता बीड जिल्ह्यात भासली होती. मात्र, दोन वर्षांपासून पाऊस चांगला झाल्यामुळे चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला असून, चार छावण्यांची आवश्यकता भासणार नाही. दरम्यान, ज्वारीचा पेरादेखील मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कडबा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ओला आणि वाळलेला चारा उपलब्ध असणार आहे.
अशुद्ध पाणीपुरवठा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शुद्ध
पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
पाणंद रस्त्याची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने यामध्ये लक्ष घालून रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गटारी तुंबल्याने अस्वच्छता वाढली
नेकनूर : नेकनूर हे आठवडी बाजाराचे मोठे गाव आहे. मात्र, गावातील गटारी तुंबल्यामुळे गावकऱ्यांसह बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गटारी साफ करण्याची नागरिकांकडून वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, ग्रामसेवकांनी लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी आहे; परंतु अद्यापदेखील दुर्लक्षच आहे.
स्थानकात अस्वच्छता
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे
अंबाजोगाई : गावोगावी स्वच्छता अभियान जोमाने राबविले जात होते. त्यामुळे गावची स्वच्छताही कायम राहत होती. मात्र, कोरोनाचे संकट उद्भवल्यापासून स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. पुन्हा लोकसहभागातून गावोगावी स्वच्छता अभियानाची मागणी होत आहे.