बीड : येथील अनेक शासकीय कार्यालय परिसरात दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाहन परत मिळेल याची खात्री नाही.
उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील परिसरात अनेक विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्र उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसवून रोहित्राला दार बसवावे, अशी मागणी आहे.
विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भाग त्रस्त
शिरूर कासार : तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वीजप्रवाह खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याचा मोठा फटका छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे. विजेचा सुरळीत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी वीजग्राहकांतून केली जात आहे. परंतु अद्यापही वीज वितरणकडून याबाबत लक्ष दिले गेलेले नाही.
कचऱ्यामुळे दुर्गंधी
कडा : शहरातील बसस्थानका सभोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. दुर्गंधीचा त्रास येथील प्रवासी आणि नागरिकांना करावा लागतो. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे. प्रवाशांसोबतच परिसरात राहणाऱ्या जनतेचेही आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेची मागणी जोर धरू लागली आहे.
डुकरांकडून नुकसान
पाली : परिसरात रानडुकरांकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित असून, वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. रानडुकरांमुळे परिसरातील पिके फस्त होऊ लागले आहे. हातातोंडाशी आलेला घास अशा प्रकारे जाताना दिसत असल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत.
वाहतुकीस अडचण
वडवणी : शहरापासून कवडगाव देवडीसह ग्रामीण भागातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी वेल, झाडे वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. यामुळे वाहन चालवितांना अडचणी येत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील काटेरी झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
मुतारीमध्ये अस्वच्छता
वडवणी : वडवणी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बाजारपेठत दररोज शेकडो नागरिक, व्यापारी व्यवसायिक येतात. शहरातील बाजारतळ परिसरात सार्वजनिक शौचालय उभारली आहेत. मात्र स्वच्छतेआभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी केली आहे.
बीड-पाटोदा रस्त्याची दुरवस्था
पाटोदा : तालुक्यातील शंभरचिरा, रोहतवाडी, नायगाव मार्गे असलेल्या बीड ते पाटोदा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुरवस्थेने वाहने घसरत असल्याने अपघातही वाढू लागले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.