सीसीटीव्हीची मागणी
गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून छोटे-मोठे अपघात होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील चक्रधरनगर, शिंदेनगर भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या भागामध्ये मुरूम टाकण्यात आला आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी आहे.
अवैधरीत्या दारूविक्री
वडवणी : काही दिवसांपूर्वी बंद झालेली अवैध दारूविक्री परिसरात जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे, तसेच हॉटेल, पानटपरी, तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. याकडे मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कामे पूर्ण करा
बीड : नगर परिषदेच्या वतीने शहरात सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, शहरातील विविध भागांत रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
वाहने हटविण्याची मागणी
तेलगाव : येथील चौफाळा परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे कधी कधी वादाचेदेखील प्रसंग उद्भवत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही वाहने हटविण्याची मागणी होत आहे.