बीड : गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून १८८ नुसार कारवाई करण्यात येते. गर्दी होऊ नये म्हणून तसेच इतर नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जातात. बीड जिल्ह्यात चालू वर्षात या कलमाखाली जवळपास १९८२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु या कारवाईकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा प्रसार गर्दीमुळे होत असल्याने कलम १८८ नुसार व जमावबंदीसाठी कलम १४४ नुसार कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च २०२० पासून टप्प्याटप्प्याने विविध नियम आणि निर्बंध राज्य शासनाच्या वतीने घालण्यात आले होते. या काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक करावाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी लॉकडाऊन काळात सतत रस्त्यावर उभा होते. कोरोनाकाळात गर्दी टाळण्यासाठी तसेच यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाची जबाबदारी पोलीस प्रशासनाच्या वतीने निभावली होती. या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास १९८२ जणांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर मास्क न वापरणारे, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांकडून जवळपास एक कोटीपेक्षा जास्त दंड आकारण्यात आला होता. याच काळात अनेक अडचणींचा सामना पोलीस प्रशासनातील जवानांना करावा लागला. यामुळे वाद झाले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र, गुन्हे दाखल होऊनदेखील याचे गांभीर्य नागरिकांना नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून कायम केले जात आहे.
...
काय आहे कलम १८८?
साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येते. या आदेशाचे पालन न केल्यास शिक्षाही होऊ शकते. एखादी व्यक्ती या काळात नियमांचे उल्लंघन करून इतरांना धोका निर्माण होईल, असे वर्तन करीत असेल तर गुन्हा दाखल करण्यात येतो. या कलमानुसार दोन महिन्यांची शिक्षा व दोनशे रुपये दंडाची तरतूद आहे, तर शिक्षेत सहा महिन्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
...
कायद्याचे पालन करणे गरजेचे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल होणारे हे गुन्हे अदखलपात्र आहेत. कायद्याचा धाक राहणे गरजेचे आहे. म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले आहे.
...
जिल्ह्यातील दाखल गुन्हे १९८२
वाहनांवरील दंडात्मक कारवाई ४५,०००
दंड वसुली १,०४,३५,८९२
...
गांभीर्यच नाही
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये हजारो नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले. विनाकारण गर्दी करणे, मास्कचा वापर न करणे, यावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविणे यासारख्या बाबी सर्रासपणे घडत होत्या. प्रशासाने कारवाईसाठी अनेक पथकांची नियुक्ती केली होती. या पथकाने दंड वसूल करून गुन्हेही दाखल केले आहेत.
....