केज : युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील केकतसारणी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने धाड मारून जुगार खेळणाऱ्या वीस जणांना ताब्यात घेत, रोख आणि वाहने असा सात लाख पन्नास हजार सत्तर रुपयांचा ऐवज जप्त केला. २८ जानेवारी रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या वीस जणांवर शुक्रवारी सकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील केकतसारणी शिवारात रामधन करांडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून पत्त्याचा जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकास मिळताच, सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्यासह पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून अचानक जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी राजाभाऊ आकुसकर (रा.आडस ता.केज), बाळासाहेब राऊत (रा.चिंचोलीमाळी, ता. केज), लहू वाघमारे (रा.आडस), किसन जाधवर (रा. रत्नापुर ता.कळंब), महादेव मस्के (रा.भिमनगर ता.केज), श्रीराम केकाण (रा.केकाणवाडी), अमोल शेप (रा. लाडेवडगाव), बालासाहेब गालफाडे (रा. चिंचोलीमाळी), बाजीराव अंडील (रा. पाहाडी, पारगाव), कलीम सय्यद (रा.अजीजपुरा केज), सिलवंत शिंदे (रा. लाडेवडगाव), सुरेश माने (रा. ब्रह्मणपूर, ता.बीड), संतोष येवले (रा.मादळमोही, ता. गेवराई), अरुण माने (रा. ब्रह्मणपूर ता.बीड), कलीम शेख (रा. कोरडगाव, ता.पाथर्डी जि.अहमदनगर), दिलीप खरचन (रा. आखेगाव, ता.शेवगाव जि.अहमनगर), विष्णू ढोले (रा. आडस, मराठागल्ली आडस), गोरख वायबसे (रा. कासारी, ता. केज), अशोक उजगरे (रा.आसरडोह ता.धारुर) व चरणदास काळे (रा.उमरत पारगाव, ता.जि.बीड) हे वीस जण फेक पत्ता (झन्ना-मन्ना) नावाचा जुगार खेळताना आढळून आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी.व्ही. कांदे करीत आहेत.