गेवराई : प्रजासत्ताक भारताच्या राज्यघटनेने सर्व समाजाला समान पातळीवर आणलेले आहे, हेच सम्यक क्रांतीचे स्वप्न आम्ही ‘यातना उत्सव’ या नाटकामधून बघितल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाटककार प्रा. बापू घोक्षे यांनी केले. येथील महिला महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’च्या अंतिम दिवशी ‘माझी नाट्य लेखनप्रक्रिया’ या विषयावर प्रा. बापू घोक्षे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातील असलेल्या ‘यातना उत्सव’ या नाटकाची लेखनप्रक्रिया प्रा. बापू घोक्षे यांनी मांडली. अनुभवकथनासोबतच दलित साहित्य आणि समाजाच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केले. आपले अनुभवकथन करताना ते म्हणाले, समाजाच्या वर्णसत्ताधारित किंवा धर्मसत्ताधिष्ठित विषमतावादी संस्कृतीला महान कसे म्हणता येईल? मानवाचे निसर्गदत्त माणूसपण नाकारणारी संस्कृती एकसंध मानवतावाद कसा उभा करू शकेल, असे प्रश्न उभे करीत त्यांनी संस्कृतीचा गतिमान रथ आता क्रांतीच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात जाळल्या गेलेल्या एका दलित वस्तीचे भग्नावशेष बघून मला ‘यातना उत्सव’ ही नाट्यकृती लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचेही प्रा. बापू घोक्षे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविकात प्रा. नामदेव शिनगारे यांनी दलित रंगभूमी-साहित्याचा आढावा घेत प्रा. बापू घोक्षे यांच्या समग्र साहित्याची चर्चा केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ संजय भेदेकर यांनी केले. प्रा. डॉ प्रवीण शिलेदार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ प्रवीण शिलेदार, प्रा. रामहरी काकडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्राध्यापक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘यातना उत्सव’मधून आम्ही सम्यक क्रांतीचे स्वप्न बघितले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST