जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबत नसल्याचे दिसत आहे. आरोग्य विभाग व प्रशासनाला हे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नव्या वर्षात दाेन दिवस मृत्यूला ब्रेक लागल्याने दिलासा मिळाला होता; परंतु सोमवारी आणखी तीन मृत्यूची नोंद झाली. यात पाटोदा शहरातील ५५ वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील ७० वर्षीय पुरुष व अंबाजोगाई तालुक्यातील ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी ४७९ संशयितांची चाचणी करण्यात आली. यात ४५३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर २६ पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई तालुक्यात ६, आष्टी १, बीड १०, गेवराई, केज, परळी, पाटोदा व वडवणी येथे प्रत्येकी १ आणि माजलगावमधील तिघांचा समावेश आहे. तसेच सोमवारी २५ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६ हजार ९०२ एवढी झाली आहे. पैकी १६ हजार ९९ कोरोनामुक्त झाले असून ५३६ जणांचा मृत्यू झाला आहे.