अंबाजोगाई : शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये व मुख्य रस्त्यालगत बसून दररोज भाजीपाला विक्रेते व्यवसाय करतात. त्यातून त्यांना रोजगार मिळतो. परंतु मुख्य रस्त्याच्या लगत बसत असल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक आपली वाहने भररस्त्यावर उभी करतात. त्यामुळे निम्मा रस्ता व्यापून जातो. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. इतर कारवाया सोबतच पोलिसांनी दररोजच्या समस्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये सर्व ठिकाणचे आठवडे बाजार बंद करण्यात आलेले होते. बाजार भरविण्यासाठी संपूर्ण बंदी होती. भाजीपाला विक्रीसाठी ठरवून दिलेल्या दिवशी मुभा होती.
भाजीपाला विक्रेते, हातगाडे, दुकानांच्या पाट्या, उभा राहिलेली वाहने, इत्यादी बाबी वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शहरातील रस्त्याचे नव्याने केलेल्या डांबरीकरणामुळे रस्त्याच्या कडेला मोठा चढ-उतार निर्माण झाला आहे. त्यासाठी साईडपट्ट्या भरून घेणे आवश्यक झाले आहे. रस्त्यावरून वाहने खाली उतरता येत नसल्याने अनेक वाहनधारकांना नाईलाजाने आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे आणखीनच वाहतुकीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
शहरातील सावरकर चौक, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत भगवान बाबा चौक, प्रशांत नगर, बस डेपो, अण्णा भाऊ साठे चौक, मांडवा रोड, मोरेवाडी, यशवंतराव चव्हाण चौक इ. ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. ही समस्या वाहनधारकांसाठी व नागरिकांसाठी दररोजची झाल्याने त्रासदायक ठरत आहे.
भाजीपाला अथवा छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी वाहतुकीस अडथळा न करता व्यवसाय करावा. आता आठवडे बाजार सुरू केलेले आहेत. त्या ठिकाणी आपला व्यवसाय करावा. या बाबतीत वरिष्ठांशी बोलून पुढील कारवाई करण्यात येईल.
- भरत लखेरा, स्वच्छता निरीक्षक