उन्हाळा सुरू होऊन महिना लोटला असून, सध्या उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसून येत आहेत. बहुतांश ठिकाणी विहीर, बोअरवेलची पाणीपातळी खालावली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेवराई तालुक्यातील बंगाली-पिंपळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ठोंबरे वस्ती व जहागीरदार वस्ती या ठिकाणी येथील रहिवासी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील महिला, ग्रामस्थांवर आली होती. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन येथील रहिवासी असीफ जहागीरदार यांनी पुढाकार घेऊन रविवारी ठोंबरे वस्ती, तसेच शाहू नगर तांडा रोडवरील जहागीरदार वस्ती येथे दोन बोअरवेल स्वखर्चाने घेतले. या दोन्ही बोअरवेलला चांगले पाणी लागले असून, त्यावर हातपंप बसविण्यात येणार आहेत. यानंतर हे दोन्ही हातपंप वस्तीवरील नागरिकांसाठी खुले असणार आहेत, असे असीफ जहागीरदार यांनी सांगितले. जहागीरदार यांच्या दातृत्वाची ग्रामस्थांनी प्रशंसा करून समाधान व्यक्त केले.
स्वखर्चाने बोअर घेत वस्तीची भागविली तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST