टक्का कागदावरच वाढतोय : संपर्क करूनही नागरिक चाचणीला येईनात
बीड : राज्याच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा टक्का समाधानकारक आहे; परंतु हा टक्का केवळ कागदावरच वाढत चालला आहे. संपर्क शोधल्यानंतर त्या व्यक्तींची कोरोना चाचणीच केली जात नाही. आरोग्य विभागाने वारंवार संपर्क करूनही लोक चाचणी करीत नाहीत. या प्रकाराला जेवढा आरोग्य विभाग जबाबदार आहे, तेवढीच जनताही असल्याचे दिसते.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ९ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील १८ हजार ५०२ लोकांचा अहवाल कोराेना पॉझिटिव्ह आला. या बाधित रुग्णांचा संपर्क शोधण्यात बीड जिल्हा कायम पुढे असतो. बीडचा टक्का प्रतिरुग्ण २३.४० एवढा आहे, तसेच आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ६ लोकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आली आहे. असे असले तरी संपर्काच्या तुलनेत पूर्णपणे चाचण्या केल्या जात नसल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे.
दरम्यान, आता शासनानेच एका रुग्णामागे किमान २० कॉन्टॅक्ट शोधण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होईल; परंतु हायरिस्कवाल्यांचा स्वॅब घेणे आणि लो रिस्कवाल्यांना होम क्वारंटाईन करणे, हे नियम कडक करण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य विभागाला कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. नागरिक ऐकत नसल्याने वेळप्रसंगी पूर्वीप्रमाणेच पोलिसांचीही मदत घेण्याची शक्यता आहे.
उदाहरण १
बीड शहरातील एक पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळला होता. त्याच्या केवळ पत्नीची चाचणी करण्यात आली. प्रत्यक्षात त्यांच्या कार्यालयातील व सोबत काम करणाऱ्यांची चाचणी झाली नव्हती. आरोग्य विभागाकडून संपर्क झाला होता.
उदाहरण २
३५ वर्षीय महिला ॲंटीजेन चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर या महिलेच्या संपर्कातील सर्वांची चाचणी करणे अपेक्षित होते; परंतु एकाही व्यक्तीची चाचणी झाली नाही. या महिलेला अधिकाऱ्यांच्या परवानगीने होम आयसोलेट केले होते.
उदाहरण ३
थोडा थकवा जाणवत असल्याने ३५ वर्षीय पुरुषाने चाचणी केली. यात तो लगेच बाधित आढळला. त्याला होम आयसोलेट केले. घरी त्यांनी कोरोनाचे पूर्ण नियम पाळले; परंतु संपर्कातील एकाही व्यक्तीची चाचणी केली नाही.
बीडमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा टक्का प्रतिरुग्ण २३४० एवढा आहे. बाधित रुग्णांशी जवळून संपर्क आलेल्यांची कोरोना चाचणी केली जाते तर लांबून संपर्क आलेल्या होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले जात आहे. याबाबत वारंवार संपर्क करूनही लोक चाचणी करायला पुढे येत नाहीत.
- डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.