बीड : प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी नाहीत, असे सांगत येथीलच सरकारी डॉक्टर रुग्णांन स्वत:च्या खाजगी क्लिनिकमध्ये घेऊन जातो. तेथे तो त्यांची आर्थिक लूट करत आहे. यासाठी आरोग्य केंद्रातून क्लिनिकमध्ये जाण्यासाठी व्यवस्थाही केली आहे. हा धक्कादायक प्रकार घाटनांदूरमध्ये उघडकीस आला आहे. मागील दोन वर्षांपासून सरकारी डॉक्टर सर्रासपणे सामान्यांची लूट करीत असून, याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर आरोग्य केंद्र कायाकल्प, आरोग्यवर्धिनी, प्रसूती आदीमध्ये राज्यात अव्वल राहिलेले आहे. नुकताच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही मिळाला आहे. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुंडे व डॉ. विलास घोळवे हे दोघे वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतात; परंतु डॉ. घोळवे हे आरोग्य केंद्रात न थांबता खाजगी क्लिनिकमध्ये सराव करतात. विशेष म्हणजे औषधी नाहीत, सुविधा नाहीत, अशी कारणे सांगून ते सरकारीतील रुग्ण खाजगीमध्ये पळवतात व येथे हजारो रूपये बील काढून आर्थिक लूटही करतात. हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असून, तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. आता यात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली होती. यात त्यांना आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत तोडून लोखंडी पायरी बनवून खाजगी क्लिनिकमध्ये जाण्यासाठी केलेला रस्ता दिसला. त्यांनी याची गंभीर दखल घेत ही भिंत पूर्ववत करण्यासह रस्ता बंद करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, कोरोना काळातही सरकारी डॉक्टरांकडून सामान्य रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचे उघड झाले आहे. सरकारीत लाखोंचे वेतन असतानाही त्यांच्याकडून खाजगी सराव केला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोट
घाटनांदूर आरोग्य केंद्राची तक्रार आली आहे. तक्रारीत गंभीर मुद्दे आहेत. याबाबत तात्काळ नोटीस बजावून खुलासा मागविला जाईल. सोमवारपासून चौकशीला सुरुवात होईल.
डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
कोट
असे काहीही घडलेले नाही. बाजूला एक खाजगी लॅब आहे, तेथे मी बसतो; परंतु एकही रुग्ण तपासत नाही. कोणाकडूनही रुपया घेतला नाही. मला मानसिक त्रास दिला जात असून, या तक्रारीत तथ्य नाही.
-डॉ. विलास घोळवे, वैद्यकीय अधिकारी, घाटनांदूर