गेवराई : वडील आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्व कुटुंबीय माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २१ मे रोजी उघडकीस आली. हे सोन्याचे दागिने दोन लाख रुपयांचे असून, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी नामदेव मेंडके यांचे वडील नामदेव मेंडके हे एप्रिल महिन्यापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रवी मेंडके यांच्या आत्या माजलगाव येथे वास्तव्यास असल्याने सर्व कुटुंब त्यांच्याकडे राहते. नामदेव मेंडके त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या वेळी घरातील सर्व सदस्य त्यांची काळजी घेण्यासाठी गेले होते. उपचारादरम्यान नामदेव मेंडके यांचे १३ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर माजलगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कुटुंबातील सर्व सदस्य सिरसमार्ग येथे वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी आले असता घराच्या दरवाजाचे कुलूप अर्धवट उघडे असलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यावर घरातील कपाट व सर्व कपडे, साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. या वेळी कपाटातून दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. या प्रकरणी रवी मेंडके यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि संदीप काळे हे करीत आहेत.