परळी : रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेल्या रेल्वेगाड्या परळीमार्गे गेल्या महिन्यापासून सुरू केल्या आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान रेल्वेसेवा बंद होती. या बंदच्या काळात रेल्वेत व रेल्वेस्थानकात गुन्ह्याचे प्रमाण घटले होते. परंतु रेल्वेगाड्या सुरू होताच रेल्वेत चोरी व मुलीच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी परळी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मार्चच्या सरत्या आठवड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने परळीमार्गे जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, नोव्हेंबरपासून परळी रेल्वेस्थानकातून नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड ,औरंगाबाद- हैदराबाद, हैदराबाद -औरंगाबाद या दोन रेल्वे गाड्या, त्यानंतर बंगळरू- नांदेड, नांदेड -बंगळरू ही रेल्वे गाडी सुरू केली आहे. परंतु, पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. एकूण सहा रेल्वेगाड्या परळी रेल्वेस्थानकातून सध्या धावत आहेत. या रेल्वेगाड्या सुरू करण्यापूर्वी परळी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान केवळ एकच गुन्हा दाखल आहे. त्यात दारूबंदी आदेशाचे उल्लंघन असून आरोपीविरोधात दोषपत्र दाखल केले आहे.
रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्यानंतर गंभीर गुन्ह्याची संख्या वाढली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात दागिने व मोबाईल चोरीचे गुन्हे घडले असून एका मुलीचे अपहरणही रेल्वेत झाले आहे. या सर्व घटना लातूर रोडवर घडल्या आहेत. रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास चालू असल्याचे परळी रेल्वे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
सर्वाधिक गुन्हे
परळी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लातूर रोड रेल्वेस्थानकात रेल्वेमध्ये एका प्रवाशाचे सोन्याचे दागिने व एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत.
रेल्वेतील गुन्हे..
रेल्वे सुरू झाल्यानंतर पनवेल -नांदेड या रेल्वेगाडीत परळी -गंगाखेडदरम्यान एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून अद्यापपर्यंत या मुलीचा व अज्ञात आरोपी काही शोध लागलेला नाही. तसेच रेल्वेगाडीत दोन चोरीच्या घटना लातूर रोडवर घडल्या आहेत.
परळी रेल्वे पोलीस स्टेशन महिना दाखल गुन्हे यशस्वी तपास एप्रिल 0 0 00 मे 00 00 जून 00 00 जुलै 01 होय ऑगस्ट 00 00 सप्टेंबर 00 00 ऑक्टोबर 00 00 नोव्हेंबर. 02 नाही डिसेंबर 01. नाही