बीड : आष्टी तालुक्यातील जामखेड-अहमदनगर रोडवर हरिनारायण आष्टा फाटा येथे शिवजयंतीनिमित्त ७ फेब्रुवारी रोजी खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड, सह्याद्री सम्राट ग्रुप सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष उमेश डोके पाटील व राकाँचे सुधीर टेकाळे यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा होत आहे. स्पर्धेत प्रथम ११ हजार १११, द्वितीय ७ हजार ७७७, तृतीय ५ हजार ५५५ रुपयाचे पारितोषिक संयोजकाच्या वतीने देण्यात येणार आहे.
धारुर-आडस रस्त्याची डागडुजी सुरू
धारुर : धारुर ते आडस या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली असून, रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
स्थानकासमोरील ‘नो पार्किंग’चा बोजवारा
धारुर : धारुर बसस्थानकासमोर वाहतूक पोलीस नसल्याने ‘नो पार्किंग’चा बोजवारा उडाला आहे. सर्रास याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ‘नो पार्किंग’ची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.