लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील गंगामसला येथे गोदावरी पात्रात व आजूबाजूला चोरून जमा केलेल्या वाळूसाठ्यावर तहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने रविवारी पहाटे कारवाई केली. यावेळी या ठिकाणी ५० ब्रास वाळूसाठा जप्त केला. या कारवाईमुळे वाळूतस्करांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वाळूसाठ्याचा लिलाव नसताना गंगामसला येथे गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर वाळूउपसा सुरू होता. सत्तेतील राजकीय वरदहस्ताने हा वाळूउपसा होत असल्याची जनतेतून ओरड होती. महसूलच्या पथकाला गुंगारा देऊन व हाताशी धरून वाळूतस्करी केली जात असे. रविवारी पहाटे तहसीलदार वैशाली पाटील यांच्या पथकाने गंगामसला येथे वाळूसाठ्यावर अचानक छापा टाकला. यावेळी गोदापात्रात व आजूबाजूच्या परिसरात दुपारपर्यंत ५० ब्रास वाळू जप्त केली होती. या वाळूची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे.
....
वाळूसाठ्यांचा शोध सुरू
दरम्यान, माजलगाव तहसीलच्या पथकामार्फत वाळूसाठे शोधमोहीम सुरू आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी केलेल्या कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूसाठे असून त्या सर्व ठिकाणी कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. तहसीलदार पाटील यांच्यासोबत मंडळाधिकारी मुळाटे, तलाठी शीलवंत, गोरे, कोतवाल तपसे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
040721\purusttam karva_img-20210704-wa0026_14.jpg