लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तहसील कार्यालयाने दिलेले धनादेश बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची येथील शाखा स्वीकारत नसल्याने अखेर तहसीलदार वैशाली पाटील स्वत: शाखेत गेल्या. यावेळी बॅंक व्यवस्थापक शिंदे यांना धनादेशप्रकरणी खडे बोल सुनावत कठोर कारवाई करण्याची तंबी दिल्यानंतर धनादेश व याद्या स्वीकारण्यात आल्या असून, येत्या काही दिवसात निराधारांना पैसे वाटप सुरू होणार आहे.
वृद्ध, गरीब, अपंग, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ अशा विविध योजनांतर्गत राज्य सरकारने वाटपासाठी दिलेले धनादेश व याद्या येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा स्वीकारण्यास नकार देत असल्याने मागील तीन महिन्यांपासून निराधारांची हेळसांड होत होती.
या योजनेत पात्र लोकांना उपजीविका भागविण्यासाठी आर्थिक मदत म्हणून शासन दरमहा पैसे देते. मात्र, याठिकाणी दोन-तीन महिन्यात एकदा पैसे येतात व त्याचे वाटप पोस्ट व विविध बँकांमार्फत करण्यात येते. फेब्रुवारी व मार्च महिन्यात तहसील कार्यालयाने भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय पोस्ट खाते व जिल्हा मध्यवर्ती बँकेत पात्र लोकांच्या याद्या व रकमेचे धनादेश दिले. हे धनादेश इतर सर्व बँकांनी स्वीकारून निधीचे वाटपही केले. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तहसीलचा धनादेश व याद्या स्वीकारल्याच नाहीत. तत्कालिन जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्हा बँकेतील निराधारांची खाती बंद करण्याचे आदेश असल्याचा हवाला देत तसेच कोविडमुळे काही झाल्यास जबाबदार कोण, अशी कारणे सांगून फेब्रुवारी व मार्च महिन्याचे धनादेश स्वीकारण्याचे बँकेने टाळले. त्यामुळे निराधारांवर कोरोना व लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली होती.
सारवासारवीचा प्रयत्न
शुक्रवारी सायंकाळी स्वतः तहसीलदार वैशाली पाटील या निराधार कक्षाचे नरेंद्र रूपदे यांच्यासमवेत मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गेल्या. खुद्द तहसीलदार आल्याचे पाहून व्यवस्थापक शिंदे गांगरून गेले व पाटील यांच्या प्रश्नावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी कारवाईची ताकीद दिली. अखेर धनादेश व याद्या स्वीकारण्यात आल्या. त्यामुळे येत्या काही दिवसात निराधारांना पैसे वाटप करण्यात येणार आहे.