वर्षभरात या अवैध गौण खनिजापोटी सुमारे ३५ लाखांची दंडात्मक कार्यवाही केली असली तरी गौण खनिज अवैधरित्या उत्खनन व वाहतूक होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. महसुली विभाग त्यावर लक्ष ठेवून कार्यवाही करत असते. शुक्रवारी मुरुमाचे दोन ट्रॅक्टर भरून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांना थांबविण्यास सांगितले मात्र चालकाने न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी पाणंद रस्त्याने पाठलाग करून अखेर हायवेवर त्यांना गाठले व थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरील दोन्ही ट्रॅक्टर दहिवंडी येथील असल्याचे सांगण्यात आले.
गरजेनुसार रितसर परवाना व नियमाप्रमाणे करभरणा करून गौण खनिज नेणे जरूरी असताना चोरट्या मार्गाने असा प्रकार होत असल्याने कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरते. या दोघांनाही प्रत्येकी एक लाख सतरा हजार एवढा दंड भरावा लागणार असल्याचे बेंडे यांनी सांगितले .