माजलगाव : तालुक्यातील आडोळा येथे गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे दोन टिप्पर तहसील कार्यालयाच्या पथकाने जागेवरच पकडले. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता येथील तहसीलच्या पथकाने ही कारवाई केली. या टिप्परपैकी एक माजलगाव येथील एका नगरसेवकाच्या मालकीचा, तर दुसरा टिप्पर अंबाजोगाई येथील पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलिसाचा असल्याची चर्चा होती. प्रशासन याची खातरजमा करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या कारवाईमुळे मात्र चोरून वाळू उत्खनन सुरू असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
माजलगाव तालुक्यात दोन ठिकाणी शासनाने वाळू उत्खननाचा ठेका दिलेला आहे. यामधील आडोळा येथे काही लोक ठेक्याची जागा सोडून इतरत्र गोदावरी नदी पात्रात अवैधपणे वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करत असल्याची माहिती शुक्रवारी तहसील पथकाला मिळाली. त्यावरून सायंकाळी पाचच्या सुमारास पथक तेथे पोहोचले. त्यावेळी दोन टिप्पर( क्र. एम. एच. ४४ ७९४ व एम. एच. १२ एल. टी. ६०४३ ) आढळून आले. यातील एका टिप्परमध्ये पाच ब्रास वाळू आढळून आली, तर दुसरे टिप्पर रिकामे दिसून आले. त्यामुळे दोन्ही टिप्पर तहसील कार्यालयात आणून त्याचा पंचनामा करण्यात आला.
ही कारवाई प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे, मंडळ अधिकारी पद्माकर मुळाटे, तलाठी सुशील शीलवंत, रूपचंद आभारे, राहुल वाघचौरे, रवींद्र मडकर यांनी केली. या कारवाईनंतर संबंधित वाहनांची तपासणी करून त्यावर दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याचे प्रभारी तहसीलदार भंडारे यांनी सांगितले.
===Photopath===
030621\purusttam karva_img-20210603-wa0039_14.jpg